विद्यापीठाची उच्च शिक्षण क्षेत्रात भरारी | पुढारी

विद्यापीठाची उच्च शिक्षण क्षेत्रात भरारी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अठरा वर्षाच्या कमी कालावधीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध अभ्यासक्रमांची केलेली निर्मिती व बदल, प्रशासकीय नवीन इमारत व परीक्षा भवनचे बांधकाम, जागतिक दर्जांचे क्रीडांगण व इनडोअर स्टेडियम, 150 हून अधिक स्किल कोर्सेस तसेच यंदाच्या वर्षी धाडसाने सुरू करण्यात येणारे कॉन्स्टिट्यूट कॉलेज म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी आहे. अनेक आव्हाने असतानाही सोलापूर विद्यापीठाने खूप मोठी प्रगती साधल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के यांनी काढले.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18 वा वर्धापन दिन समारंभ साजरा झाला. सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला. उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. डॉ. दत्ता घोलप यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानपत्राचे वाचन केले.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, सोलापूरचा वेगळा इतिहास आहे. ही ऐतिहासिक भूमी आहे. हुतात्म्यांची नगरी आहे. अशा या वेगळ्या आयामाच्या जिल्ह्यात सोलापूर विद्यापीठाने आपल्या कर्तुत्वाचा ठसा अल्पकालावधीत उमटविला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बहुविद्याशाखीय पद्धतीचा अवलंब सोलापूर विद्यापीठाने आधीच प्रारंभ केलेला आहे. उच्च शिक्षणात गतीने बदल होत आहेत.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची प्रगती आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली आहे. म्हणूनच आज विद्यापीठास मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळत आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या योजना चालू करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे तयार करता आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी मानले.
यांचाही झाला पुरस्काराने सन्मान

उत्कृष्ट महाविद्यालय : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, उत्कृष्ट प्राचार्य ः प्राचार्य डॉ. शंकरराव पाटील, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, उत्कृष्ट शिक्षक : डॉ. माया पाटील, सामाजिकशास्त्रे संकुल, विद्यापीठ कॅम्पस, उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: श्री गिरीश कुलकर्णी, विद्यापीठ अभियंता राजश्री शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार: सोमनाथ धुळे, वसुंधरा महाविद्यालय, डॉ. बी. वाय. यादव शिष्यवृत्ती: दिव्या बनकर यांना दिला.

पुरस्कार विजेते चंडक यांच्याकडून विद्यापीठाला दीड लाख रुपयांचा धनादेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख 51 हजार रुपये असा हा पुरस्काराचा स्वरूप होता. मात्र, त्यामध्ये चंडक यांनी एक लाख रुपयांची भर टाकून एक लाख 51 हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठास दिला.

Back to top button