सोलापूरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस | पुढारी

सोलापूरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात आज (सोमवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बार्शी परिसरातील दोन पूल पाण्याखाली गेल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. अक्कलकोट तालुक्यातही ओढ्याच्या बाजूच्या रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने येथेही काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यास तर पावसाने तब्बल अडीचतास झोडपले. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले. अनेक भागातील शेती जलमय झाली.

बार्शीत दुचाकी गेली वाहून

बार्शी शहर व तालुक्यात वरूणराजाने काल रात्री दमदार हजेरी लावली.शहरात पडलेल्या पावसाने मध्यरात्री बार्शी-आगळगाव व बार्शी-जामगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जामगाव रस्त्यावरील पुलावरून एका दुध विक्रेत्यांची दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली. सुभाषनगर, जामगाव रोड, अलिपुर रोड,उपळाई रोड आदी विविध भागात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील छोट्या लेंडी नाल्यांना पाणी आले होते. शहरातील आगळगाव रस्त्यावरील वाणी प्लॉट भागातील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी होते. त्या भागातील रहिवाशांनी रस्त्यावर येऊन मदत केली. जामगाव रस्त्यावरील साई होंडा शो रूमजवळील पुलावरही पावसाचे पाणी साठले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

अक्कलकोट भागात सलग तीन दिवस पाऊस

अक्कलकोट तालुक्यात आज सकाळी 5.45 वाजता तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 10 वाजेपर्यंत पावसाचे बॅटिंग सुरुच होती. या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक ओढे, तलाव, विहिरी तुडूंब भरुन वाहताना दिसून येत होते. सतत तीन दिवस तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक गावांतील ओढे व नाले खळाळून वाहात आहेत. कुरनूर धरणातून ही सध्या खाली पाणी सोडले जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चपळगावसह चुंगी, काझीकणबस, किणी, बोरगाव, घोळसगाव, बादोला,हंजगी,जेऊर,हालचिंचोळी या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे बर्याच ठिकाणी ओढ्याला पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाले होते. तर तालुक्यातील अनेक तलाव तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहताना दिसून आले. तालुक्यातील अनेक भागातील प्रत्येक गावातील छोटे ओढे, नाले खळाळून वाहत असून अनेक गावांत अजूनही रस्त्यावरुन पाणी वाहत आहेत. अनेक गावात उभी ऊस व खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. तर दुसर्‍या बाजूस अनेक विहिरी आता भरण्याच्या मार्गावर असून वर्षभरासाठी शेती व पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तसेच जेऊर ते तडवळपासून भीमा काठ, हिळ्ळी बंधारा भाग, मैंदर्गी व दुधनी मंडळात ही दमदार पाऊस झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात विहिर व बोअरवेल मधील पाणी पातळीत वाढ होणार असल्याने शेतकर्‍यामधून समाधान व्यक्त होत आहे. कुरनूरमधून पाणी सोडण्यात येत असल्याने बोरी काठी असलेल्या 50 गावांना याचा फायदा होणार आहे.

अक्कलकोट स्टेशन भागात तीन तास पाऊस

अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील व परिसरातील गुरववाडी, मराठवाडी, तोळनूर, नाविंदगी, कडबगाव, अक्कलकोट स्टेशन या परिसरात पुष्य नक्षत्राने सोमवार 1 ऑगस्ट 20222 रोजी तीन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. सगळीकडे शेतात पाणीच पाणी दिसत होते. संपूर्ण परिसर जलमय झाले होते.

दक्षिण तालुक्यात तब्बल अडीचतास पाऊस

तालुक्यातील काही भागात पुय नक्षत्राच्या पावासाने सोमवारी दमदार हजेरी लावली. तालुक्यातील औज, आचेगाव, शिंगडगाव, हिपळे, होटगी स्टेशन या भागात सकाळी सहा वाजल्यापासून ते साठेआठ पर्यंत पावसाने चांगलेच झोडपून काढले. यत्नाळ, होटगी परिसरात सकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान एक तास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे इंगळगी जलाशय खळाळून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर भागात हत्तरसंग,कुडल,औराद,कणबस,बोळकवठे या भागात हलक्या श्रावण सरी बरसल्या. यंदा पावासाला उशिरा सुरूवात झाल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र पुनर्वसु नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने उर्वरीत खरिपाच्या पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.

Back to top button