सोलापूर : कर्जाला कंटाळून घर सोडलेल्या प्रसादला पोलिसांनी दिला आधार | पुढारी

सोलापूर : कर्जाला कंटाळून घर सोडलेल्या प्रसादला पोलिसांनी दिला आधार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जाला कंटाळून घराबाहेर पडलेल्या केरळ येथील एस प्रसाद यांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आधार दिला. पोलीस अंमलदार रेणुका माने-चौहान आणि त्यांचे पती पोलीस अंमलदार अमोल चौहान यांनी एस प्रसाद यांचे मनपरिवर्तन करून पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली.

केरळ येथील रहिवासी एस प्रसाद हे कर्जाला कंटाळून घर सोडून  रेल्वेने मुंबईला पोहचले. मुंबईमध्ये चोरट्याने त्यांचा मोबाईल आणि बॅग पळवली. त्यानंतर ते रेल्वेने सोलापुरात आले. सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात बॅग आणि मोबाईल चोरी झाल्याची तक्रार केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदार रेणुका माने-चौहान यांनी एस प्रसाद यांची अधिक चौकशी केली. त्यांच्याबद्दल पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांना माहिती दिली. पोलीस अंमलदार रेणुका यांनी पती पोलीस अंमलदार अमोल चौहान यांचे सहकार्याने प्रसाद यांच्या कुटुंबिंयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

एस प्रसाद यांनी त्यांची बहीण केरळ येथील रुग्णालयात कामाला असल्याचे सांगितले. चौहान दाम्पत्यांनी तेथील रुग्णालयाचा फोन नंबर शोधून काढून त्यांच्या बहिणीशी संपर्क केला. चोरट्याने बॅग आणि मोबाईल पळविले असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या बहिणीने खर्चासाठी म्हणून पोलीस अंमलदार चौहान यांच्या खात्यावर 5 हजार रुपये पाठवले. कर्जाला कंटाळून ते घरातून बाहेर पडले आहेत. याबाबत केरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असल्याची माहिती त्यांच्या बहिणीने पोलिसांना दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला. शुक्रवारी सकाळी केरळ येथील पोलीस एस प्रसाद यांच्या मुलासह सोलापुरात दाखल झाले. मानसिक तणावातून घराबाहेर पडलेल्या एस प्रसाद यांची त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून दिल्याचे समाधान असल्याचे चौहान दाम्पत्याने सांगितले.

हेही वाचा :

Back to top button