‘माळढोक’मुळे होटगी रोडवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित व्हावे | पुढारी

‘माळढोक’मुळे होटगी रोडवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित व्हावे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा नान्नज अभयारण्यात माळढोक पक्षी आढळल्याने बोरामणीसह आसपासची वनक्षेत्रे ही अतिसंवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. यामुळे बोरामणी विमानतळ होणे अशक्य असून आता होटगी रोडवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करावे, अशी मागणी सोलापूर विकास मंचने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकारल्याने मंचच्या सदस्यांनी प्रशासनावर आगपाखडही केली. प्रवासी विमानसेवेला अडसर असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत मनपाकडून चालढकल होत असल्याबद्दल मंचतर्फे मनपावर बुधवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मंचने तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

केतन शहांचे अभ्यासपूर्ण मुद्दे
यावेळी मंचचे केतन शहा म्हणाले, बोरामणी विमानतळासाठी लागणार्‍या खासगी जमीन खरेदीसाठी आतापर्यंत 117 कोटींचा खर्च झाला आहे. वास्तविक वनखात्याची जमीन घेतल्यावरच शेतकर्‍यांच्या जमिनी घेणे गरजेचे होते. पण नेमके उलटे झाले. नागपूरच्या वन विभागाने माळढोकमुळे ही जमीन विमानतळाला देता येणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले. अशातच नान्नज अभयारण्यात माळढोक पक्षी आढळल्याने नान्नज परिसरातील बोरामणीसह विविध वन जमिनी या अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्या. विमानतळाच्या 10 कि.मी. परिसरात कत्तलखाना असू नये तसेच 200 कि.मी. क्षेत्रात दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असू नये, असे विमानतळ प्राधिकरणाचे निकष आहेत. मुळेगावजवळ कत्तलखाना तसेच गुलबर्गा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. निकषांचा विचार करता बोरामणी विमानतळ होणे अशक्यच असून आतापर्यंत केलेला 117 कोटींचा खर्च वाया गेला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहा यांनी केला.

कारखानाच स्थलांतरित करावा

बोरामणी विमानतळाची शक्यता धूसर झाल्याने आता होटगी रोड विमानतळाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे याकरिता सिद्धेश्वर कारखाना स्थलांतरित करून कारखान्याची जागा संपादित करावी, अशी मागणीही शहा यांनी केली.

मनपाचे बजेट लाजीरवाणे : जाधव

यावेळी मंचचे विजय जाधव म्हणाले, मनपाच्या महसुली उत्पन्नाचे बजेट केवळ 700 कोटींच्या घरात आहे. ही बाब लाजीरवाणी आहे. पुणे व अन्य शहरांतील लघुउद्योगांची उलाढाल ही हजार कोटींहून अधिक आहे. केवळ सोलापुरात प्रवासी विमानसेवा नसल्याने विकास खुंटला आहे. पण आयएएस दर्जाचे अधिकारी ही बाब समजूनही घेत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे.

आयुक्तांना दिले निवेदन

मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याबद्दल पोलिसांचा मंचतर्फे निषेध करण्यात आला. पत्रकार परिषदेनंतर मंचच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी केतन शहा, विजय जाधव, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अनंत कुलकर्णी, आनंद पाटील, अ‍ॅड. प्रमोद शहा, गणेश पेनगोंडा, प्रतीक खंडागळे, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी बिनशर्त माफी मागावी

महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर हे सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाविषयी अनास्था दाखवत असल्याने आयुक्तांविरोधात सोलापूरकरांचा रोष दिसून येत आहे. सोलापूर विकास मंच एकाच मुद्द्यावर चर्चा करत आहे, त्यांना दुसरे काम नाही हे आयुक्तांचे विधान अत्यंत बेजबाबदार, निंदनीय आणि क्लेशदायक आहे. या वक्तव्यामुळे सर्व प्रामाणिक करदाते सोलापूरकरांना त्यांनी अपमानित केले आहे. याबद्दल आयुक्तांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी यावेळी मंचतर्फे करण्यात आली.

लवकरच जनहित याचिका

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाचे आदेश न्यायालयाने देऊनही त्याची अंमलबजावणी नसल्याने न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करण्याचा प्रयत्न मंचने केला. पण केवळ वादी किंवा प्रतिवादीलाच अशी याचिका दाखल करता येत असल्याने मंचची अडचण झाली. यावर आता जनहित याचिकेचा पर्याय असून लवकरच अशी याचिका दाखल करणार आहोत. डीजीसीए व मनपा सुनावणीचा परस्परसंबंध नाही. दोन ठिकाणचे मुद्दे वेगवेगळे आहेत. असे असतानाही आयुक्त सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीसंदर्भात चालढकल करीत आहेत, असा आरोप शहा यांनी केला.

Back to top button