सोलापूर : पोषण आहारापासून मुले राहणार वंचित | पुढारी

सोलापूर : पोषण आहारापासून मुले राहणार वंचित

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा अंगणवाडीत शिकणार्‍या सहा महिने ते तीन वर्षांच्या चिमुकल्यांना शासनाकडून पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेणार्‍या चिमुकल्यांचे आधार कार्ड शासनाने बंधनकारक केले आहे. ज्या बालकाचे आधार कार्ड नाही, त्या बालकांना पुढील महिन्यापासून आहार पुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 50 हजार बालके आहारापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 1 लाख 38 हजार 938 बालके अंगणवाडीत शिक्षण घेत आहेत. यातील 88 हजार 923 बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. तर 50 हजार 15 बालकांचे आधार कार्ड नसल्याने त्यांना पोषण आहार वितरित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अंगणवाडीतील चिमुकल्यांना पोषण आहार योजनेतून प्रती बालकास 56 ग्रॅम गहू, 30 ग्रॅम मसूर दाळ, दाळ 30 ग्रॅम, चवळी 30 ग्रॅम यासह मिरची पावडर, हळद व साखर वितरित करण्यात येते. यातून अंगणवाडीतील चिमुकल्यांना त्यांच्या घरीच पोषण आहार शिजवून दिला जातो. अंगणवाडीतील चिमुकल्यांना देण्यात येणार्‍या पोषण आहारामुळे जिल्ह्यात सद़ृढ बालकांची संख्या वाढली आहे. यामुळे कुपोषणमुक्ती झाली आहे. असे असताना केवळ आधार कार्ड नसल्याने तब्बल 50 हजार बालकांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांना वितरित करण्यात आलेल्या पोषण आहाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन प्रणालीने अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडे सादर करावे लागते. त्यामुळे आधार कार्डावर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याने यातील गैरप्रकार पूर्णपणे थांबला गेला आहे.

आधारकार्ड नसलेल्या बालकांनीही आधारकार्ड काढल्यास त्यांना आहार पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अंगणवाडीतील चिमुकल्यांना देण्यात येणार्‍या पोषण आहार योजनेत शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड नसल्याने या योजनेपासुन बालके वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी स्तरावरच आधार कार्ड काढण्याची शिबिर घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. महिनाभरात आधार कार्ड काढण्याची मोहीम पूर्ण होईल. यामुळे बालके आहारापासून वंचित राहणार नाहीत.

– जावेद शेख
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण, जि. प. सोलापूर

Back to top button