ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर | पुढारी

ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा :  अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात चार वैद्यकीय डॉक्टरांची नेमणूक असतानाही केवळ एकाच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय डॉक्टरांची चार पदे असून त्यांपैकी एकच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गेल्या दोन-तीन वर्षार्ंपासून रुग्णांची सेवा बजावत आहेत. इतर तीन वैद्यकीय अधिकारी रुजू असूनदेखील ते काही महिना व वर्षांपासून गैरहजर आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या कमी असल्याने एका अधीक्षक अधिकार्‍यावर संपूर्ण रुग्णालयाचा बोजा पडत आहे. गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून रुग्णांना सेवा देण्याची इच्छा नसेल, तर त्यांना कमी करुन त्यांच्या जागी नव्याने वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अक्कलकोट हा महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या अक्कलकोट तालुक्याकडे राजकीय किंवा प्रशासनाचे नेहमीच व वेळोवेळी दुर्लक्ष झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांची तीन पदे रिक्त आहेत. संबंधित अधिकार्‍यांकडून वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार करण्यात आला, तरीसुद्धा कोणी दखल घेण्यास तयार झाले नाही. एकाच डॉक्टरकडून दोनशे ते तीनशे रुग्णांची तपासणी केली जाते. त्या डॉक्टरांचे काम कौतुकास्पद असले तरी गैरहजर असलेल्या वैद्यकीय डॉक्टरांचे काय? त्या गैरहजर वैद्यकीय अधिकार्‍यांना अभय न देता त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण रुग्णालय हे 30 बेडचे असून या रुग्णालयात डिलिव्हरी (प्रसूती) व सिझेरियन शस्त्रक्रिया होत असतात. याबरोबर नेत्र शिबिर, आरोग्य शिबिर, व अन्य शिबिरे या रुग्णालयात होत असतात. अपघात, सर्पदंश व अशा अनेक घटना तालुक्यात घडतात. अशावेळी डॉक्टरांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड हे दोनशे ते तीनशे रुग्णांची तपासणी करतात. अधिक डॉक्टर असणे अवश्यक आहे, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा भार त्या एकाच डॉक्टरवर पडत आहे. ट्रॉमा केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली उपाध्ये व डॉ. सतीष बिराजदार यांचे सहकार्य वैद्यकीय अधीक्षकांना मिळत आहे. ग्रामीण रुग्णालयात सेवेस अधिकारी धजावत नाहीत, हे दुर्भाग्य. ग्रामीण रुग्णालयाप्रती शासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची तीन रिक्त पदे होती. शासनाने ती रिक्त पदे भरलेली आहेत. त्या रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले. एक-दोन दिवसांनी रजेवर गेले ते अद्याप आलेले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
– डॉ. अशोक राठोड
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट

Back to top button