पंढरपूर : आषाढी वारीतून व्यापार्‍यांना आर्थिक स्थैर्य | पुढारी

पंढरपूर : आषाढी वारीतून व्यापार्‍यांना आर्थिक स्थैर्य

पंढरपूर : सुरेश गायकवाड :  कोरोनानंतर दोन वर्षांनंतर प्रथमच निर्बंधमुक्त आषाढी यात्रा सोहळा भरवण्यात आला. गत दोन वर्षे कोरोनामुळे घरी बसलेले भाविक लाखोंच्या संख्येने यात्रेला आले. भाविकांची संख्या वाढल्याने प्रसादिक साहित्य, फोटो फ्रेम, पेढा, श्रींच्या मूर्ती, कुंकू-बुक्का विक्रीत मोठी उलाढाल झाली आहे. स्थानिक व्यापार्‍यांबरोबर बाहेरगावाहून आलेल्या व्यापार्‍यांनाही ग्राहकांच्या रूपात विठ्ठल भेटल्याची प्रचिती आली. व्यापार्‍यांनी अपेक्षित असलेली विक्री झाल्याने कोरोना काळात झालेले नुकसान काही अंशी भरुन निघण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आषाढी वारी चांगली झाली आहे. पाऊस आला नसता तर अधिक चांगली झाली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे सन 2019 नंतरचे सलग दोन आषाढी पालखी सोहळे भरले नव्हते. यात्रा काळात पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. केवळ परंपरा जपण्यासाठी एसटी बसने मानाच्या दहा पालख्यांना थेट पंढरपूर येथे आणण्यात आले. त्यामुळे भाविकांना घरी बसूनच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे लागत होते. तर संचारबंदीमुळे मंदिर बंद असल्याने प्रासादिक साहित्याची व इतर दुकानेही बंद ठेवण्यात आलेली होती. याचा आर्थिकपरिणाम व्यापारी वर्गावर झाला. मार्चमध्ये चैत्री यात्रा भरली होती. मात्र, जमावबंदीचे आदेश असल्याने पाच पेक्षा जास्त भाविक एकत्रित थांबण्यास मनाई करण्यात आलेली होती. दुकानांसमोरही जास्तवेळ भाविकांना थांबता येत नव्हते. पोलिस लगेच हकलून द्यायचे, त्यामुळे चैत्री यात्रादेखील पळतीच यात्रा ठरली. यातच एसटी कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संप सुरु झाल्याने एसटी बंद राहिल्या. यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणारा भाविक पंढरीत येऊ शकला नाही. त्यामुळे चैत्री यात्रा प्रशासनाचे कोरोनासंबंधीचे नियम व एसटीचा संप असल्याने जेमतेमच झाली होती.

यंदा मात्र राज्य शासनाने निर्बंधमुक्तपणे आषाढी यात्रा सोहळा साजरा करण्यास परवानगी दिली. यामुळे दरवेळेपेक्षा या यावेळेस भाविकांची संख्या वाढणार असा अंदाज प्रशासनाने व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे 15 लाख भाविक पडत्या पावसातही यात्रेला आले. आषाढी यात्रा मोठी भरणार, हा अंदाज घेऊन स्थानिक व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात माल दुकानांमध्ये भरला होता.
ज्या अपेक्षेने माल भरला, त्या अपेक्षेने विक्रीदेखील झाली असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. उरला सुरला माल देखील श्रावण महिन्यामूळे दर्शनाकरीता भाविकांची गर्दी असल्याने विक्री होत आहे. तर यात्रा काळात दशमी, एकादशी व व्दादशीला सलग पाऊस सुरू राहिला. पाच दिवस पावसाने झोडपून काढल्याने बाहेर गावाहून आलेल्या छोट्या छोट्या व्यापार्‍यांनी थाटलेल्या दुकानातून ज्या प्रमाणे विक्री व्हायला हवी होती. त्या प्रमाणात झाली नाही. कारण पावसामुळे भाविक एकादशी दिवशीच माघारी परतू लागले. द्वादशीला पंढरपूर रिकामे झाले.

यातच पावसामुळे साहित्याचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या व्यापार्‍यांना पावसामुळे फटका बसला आहे. मात्र, पंढरपूरचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे. ती आषाढी यात्रा पंढरपुरातील व्यापार्‍यांना चांगली फायदेशीर ठरली आहे.
आषाढी यात्रेत कूंक-बुक्का, पेढे, श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, पितळेच्या मुर्त्या, फायबरच्या मूर्त्या, तुळशी माळ, टाळ, मृदंग, विना, पखवाज, खेळणी याला भाविकांकडून जास्त मागणी होत होती. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, भक्तिमार्ग या ठिकाणी स्थानिक व्यापार्‍यांची कायम स्वरुप दुकाने, हॉटेल्स होती. तर शहरातील स्टेशन रोड, गांधी रोड, बुरुड गल्ली रोड, चप्पल लाईन, टिळकस्मारक, गोपाळपूर रोड, संतपेठ सांगोला चौक, भोसले चौक रोड, सरगम चौक ते इसबावी रोड, 65 एकर परिसर रोडवर स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या छोट्या छोट्या व्यापार्‍यांनी दुकाने, स्टॉल उभारले होते, तर फेरीवाले सर्वच रस्त्यांवरून फिरत होते.

कोरोनानंतर भरलेली ही आषाढी यात्रा कोरोनाअगोदर भरल्यासारखी जाणवली. भाविक मोठ्या संख्येने होते. अपेक्षेप्रमाणे तांबा, पितळेच्या मूर्तींची विक्री झाली आहे. भाविकांकडून मागणी होत होती, होत आहे. वारीत पाऊस आला नसता तर वारी अधिक चांगली झाली असती.
– प्रवीण गंजेवार,
तांबा-पितळ मूर्तींचे व्यापारी

आषाढी वारी चांगली भरली होती. भाविकांकडूनही प्रासादिक साहित्याची चांगली मागणी होेत होती. अपेक्षित विक्री झालेली आहे. श्रावण महिन्यामुळे अजून विक्री होणार आहे. कोरोनासारखे संकट पुन्हा येऊ नये, गजबजलेली पंढरी पुन्हा पुन्हा पाहू दे विठ्ठला, असे म्हणत समाधानी आहे.
– गजानन भोसले,
प्रासादिक साहित्य भांडार, व्यापारी

Back to top button