हुतात्म्यांच्या परिवाराकडून उद्या ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा | पुढारी

हुतात्म्यांच्या परिवाराकडून उद्या ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा भारत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वेकडून आजादी का अमृत महोत्सवी वर्ष अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील हुतात्मा एक्स्प्रेसची निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत या एक्स्पे्रसला बुधवारी (दि. 20) सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या कटुंबातील सदस्य हुतात्मा एक्स्प्रेसला ध्वज दाखवून सोडणार आहेत. भारतीय रेल्वे मात्र यंदा देश स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहे. त्याअंतर्गत स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्याअंतर्गत त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्याहस्ते ध्वज दाखवून रेल्वे सोडण्यात येणार आहे. याअंतर्गत चार हुतात्म्यांच्या परिवारातील सदस्यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून तसेच18 जुलै ते 23 जुलै दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे.

यासाठी भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यातील 27 रेल्वे गाड्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्राच्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 15 जुलै 2001 पासून सोलापूर- पुणे दरम्यान धावणार्‍या धावणार्‍या हुतात्मा एक्सप्रेसची निवड केली आहे. या गाडीचा प्रवास बारा डब्यापासून सुरू होऊन 16 डब्यापर्यंत पोहोचला आहे. सोलापूरकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणार्‍या हुतात्मा एक्सप्रेसने 21 वर्षे पूर्ण करुन नुकतेच 22 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त हुतात्मा एक्सप्रेसचा सोलापूरकरांकडून मोठ्या थाटात वाढदिवस ही साजरा करण्यात आला होता.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना मानवंदना देत त्यांच्या स्मरणार्थ 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता गाडीला पताके, फुलांच्या माळा, विविध रंगाच्या फुग्यांनी सजविण्यात येणार आहे. चार हुतात्म्यांच्या परिवारातील सदस्यांच्या हस्ते हुतात्मा एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर रेल्वे प्रशासनाने दिली.

Back to top button