पिंपरी : टेम्पोचालकाचा अपघातानंतर दाबला गळा | पुढारी

पिंपरी : टेम्पोचालकाचा अपघातानंतर दाबला गळा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  अपघातानंतर दुचाकीवरील दोन जणांनी टेम्पोचालकाचा गळा दाबून त्याला पाण्यात फेकून दिले. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्यासुमारास म्हाळुंगे येथे घडली.संकेत दिलीप शेडगे (वय 21) आणि दिलीप शेडगे (वय 40, दोघेही रा. शिवाजी चौक, म्हाळुंगेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दिलीप शेडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी रमेश बाळू पवार (21, रा. अर्जुननगर, म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. 14) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास महालक्ष्मीदेवी मंदिर चौक, अर्जुननगर महाळुंगे येथे फिर्यादी आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पो उजवीकडे वळवत होते.

त्यावेळी म्हाळुंगे गावाकडून आलेल्या आरोपीने आपल्या दुचाकीची धडक त्यांच्या टेम्पोला दिली. या अपघातात आरोपी संकेत हा स्वतः जखमी झाला व त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी रमेश पवार आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. दोघांचाही गळा जोराजोराने दाबून फिर्यादी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादी रमेश यांना पाण्यामध्ये फेकून दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल नेमणे तपास करीत आहेत.

Back to top button