सोलापूर : झेडपीच्या अधिकार्‍यांचा खुर्चीपासून पळ | पुढारी

सोलापूर : झेडपीच्या अधिकार्‍यांचा खुर्चीपासून पळ

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय सेवेतील क्‍लास वन अधिकार्‍याची खुर्ची मिळावी, यासाठी विद्यार्थी दशेत असताना अथक प्रयत्न होतात. अथक परिश्रम व कष्टाने क्‍लास वन अधिकार्‍याची खुर्ची मिळाल्यानंतर मात्र या खुर्चीपासून पळ काढताना झेडपीचे अधिकारी दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी हे एक तर अ‍ॅन्टी चेंबर मधून किंवा दालनाबाहेर कोठेही थांबून कामकाज करीत असल्याने याबाबत आश्‍चर्य निर्माण होत आहे.

जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांना क्‍लास वन दर्जा आहे. त्यांना राज्य शासनाने अनेक सोयी व सुविधा देतानाच चांगले वेतनही दिले आहे. स्पर्धा  परीक्षा उत्तीर्ण झालेले व पदोन्‍नतीनंतर मिळालेल्या खुर्चीला काटेच अधिक असल्याची भावना बहुतांश अधिकार्‍यांत बळावत असल्याने अधिकारी या खुर्चीपासून पळ काढत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग आदी प्रमुख विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या खुर्च्या या कायम अधिकार्‍यांविना रिकाम्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेत अधिकारी आहेत की नाहीत असा प्रश्‍न पडत आहे. जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर असलेल्या विभागात मात्र वरिष्ठ अधिकारी नेहमीच हजर असलेले दिसून येतात.

मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरीक्‍त मुख्य कार्यकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्‍त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.कृषी विकास अधिकारी यांच्या खुर्च्या मात्र नेहमीच अधिकार्‍यांच्या उपस्थित दिसून येत असल्याचेही सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे. याउलट परिस्थिती जिल्हा परिषदेच्या पाठीमागील इमारतीत व तिसर्‍या मजल्यावरील विभागात असल्याचेही अनुभव नागरिकांतून सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत पुर्वी अधिकार्‍यांना अँटी चेंबर नव्हते. अधिकार्‍यांच्या दालनात सीसी टिव्ही लावण्यात आल्यानंतर अँटी चेंबर करून घेण्याचे वारे अधिकार्‍यांत घुसले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्रत्येक अधिकार्‍यांस आज त्यांचे अँटीचेंबर आहे. या चेंबरमध्ये सीसी टिव्ही नाही. त्यामुळे काही अधिकारी अ‍ॅन्टी चेंबरमध्ये काही वेळ घालवत असताना दिसुन येतात. तर काही अधिकारी तर चक्‍क जिल्हा परिषदेत न राहता सोलापूरातच अन्य कोठेतरी थांबून प्रशासकीय कारभार आपल्या मर्जीने करीत असल्याचे दिसून येत आहे.

अधिकार्‍यांच्या मस्तवालपणा बाबत अनेकदा चर्चा होते. अनेक वेळा याबाबत जि.प.प्रशासनाकडे तक्रारीही करण्यात आले आहेत. मात्र
खुर्चीपासून पळ काढणार्‍या अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍यांना आवरणार कोण असा प्रश्‍न आता सर्वसामान्यांतून उपस्थित होत
आहे.

एमपीएससी उत्तीर्ण अधिकार्‍यांची सकारात्मकता 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा उत्‍तीर्ण होत प्रशासकीय सेवेत अधिकारी झालेल्या युवा अधिकार्‍यांची प्रशासकीय कामात सकारात्मकता दिसून येत आहे. त्यांचा काम करण्याचा उत्साही चांगला दिसून येत आहे. पदोन्‍नती व प्रभारी कारभारी पदावर असलेल्या बहुतांश अधिकार्‍यांत मात्र नैराश्य दिसून येते. यातील बहुतेक अधिकारी हे खुर्चीपासून पळ काढताना दिसून येतात.

Back to top button