पावसामुळे पंढरपूर शहरातील रस्ते उखडले | पुढारी

पावसामुळे पंढरपूर शहरातील रस्ते उखडले

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेच्या तोंडावर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र, हे खड्डे बुजवून दोन आठवड्यांचा कालावधी होतो न होतो , तोच रस्ते ुखडून मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दुचाकीसह चारचाकी व अन्य वाहनांचा खडड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडत आहेत. तर पे अँड पॉर्किंग असलेल्या वाहन तळांवर मुरुमीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात न आल्याने येथे चिखलात वाहने अडकून बसल्याचे चित्र दिसून येत असल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या पाच दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे. या पावसामूळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा आषाढी यात्रेवरही परिणाम झाला आहे. भाविक आले एकादशी साजरी झाली आणि लगेच परतही गेले. आषाढी यात्रेला आलेल्या पालख्या दिंड्या पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात मुक्कामी होत्या. त्यामुळे बहुतांश पालखी, दिंड्याची वाहने तसेच भाविकांची वाहने वाहन तळावर पार्किंग करण्यात येत होती. याकरीता नगरपरिषदेकडून पार्किंसाठी चार्जही लावण्यात येत होता.

मात्र, पंढरपूर नगरपरिषदेने आषाढी यात्रेत पाऊस असतो. हे लक्षात घेवून वाहन तळांवर मुरुमीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेच होते मात्र तसे न केल्याने तेथे चिखल तयार झालेले आहे. अशी परिस्थिती शहरातील सर्वच वाहन तळांवर दिसून येत आहे. त्यामूळे सद्या पंढरीत आलेले व येणारे भाविक वाहन तळाची अवस्था पाहून वाहने वाहन तळावर उभी करण्याऐवजी रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामूळे नगरपरिषदेचा वाहनतळ पार्किंगचा प्रयत्न फसला असल्याचे दिसून येते. आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हा प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने वेळोवेळी आषाढी यात्रा पूर्वनियोजन बैठक घेण्यात आल्या होत्या.

या बैठकीतही सर्व विभागानी समन्वयाने कामे करावीत, भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सुचना होत्या. त्यामुळे प्रामुख्याने शहरातील रस्ते दुरुस्ती करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार यात्रेपुर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. मात्र, ऐन यात्रेतच पाऊस सुरु झाला आणि या पावसात बुजवण्यात आलेले खड्डे उखडले गेले आहेत. रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुख्य चौकांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिलेले आहे. या पाण्यातून व खड्ड्यातून वाहनधारक, भाविकांना वाट काढत जावे लागत आहे. पावसाच्या पाण्यामूळे खडड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी वाहने, रिक्षा, चारचाकी वाहने खड्ड्यात अडकली जात आहेत. तर खड्डेमय रस्त्यामूळे वाहन त्यातून गेले की पावसाचे पाणी पायी चालत जाणार्‍या व येणार्‍या भाविकांच्या व नागरिकांच्य अंगावर येत असल्याने त्यांना त्रास सहन कराव लागत
आहे.

मुख्य चौकांमध्ये खड्ड्यांत पाणी

शहरातील मुख्य रस्ता असलेल्या स्टेशन रोडवर छत्रपती शिवाजी चौक, वीर सावकर चौक, डॉ. आंबेडकर चौक तसेच महात्मा फुले चौक, चौफळा, ब्लड बँक, गाडगे महाराज चौक, नवीन बसस्थानकासमोरी रस्ता येथे खड्डे पडून त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. तर शहरातील सर्वच रस्त्यांवर लहान खड्डे तयार झाले आहेत. तर भाई राऊळ पुतळा ते माळीवस्ती टाकळी रोड या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यावरही पाणी साचून राहत आहे.

Back to top button