सोलापूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामूळे सिनेट निवडणुकीपासून हजारो विद्यार्थी वंचित राहणार | पुढारी

सोलापूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामूळे सिनेट निवडणुकीपासून हजारो विद्यार्थी वंचित राहणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक पदवीधर नोंदणीबाबत विद्यापीठाच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थी मतदानापासून वंचित राहतील, असे प्रा. नरेंद्र काटीकर यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी विद्यापीठाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाने केलेल्या प्रसिद्धिकरणानुसार सन 2004 म्हणजेच विद्यापीठाच्या स्थापने पूर्वीचेच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील पदवीधर हे नोंदणीसाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. तथापि 2004 पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी, स्वाभाविकरीत्या 2004 नंतर नैसर्गिक कालावधीप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर झालेले आहेत.

अशावेळी आपल्या म्हणण्यानुसार त्यांची आपल्या विद्यापीठांमध्ये पदवीधर म्हणून नोंदणी होऊ शकत नाही व ते नोंदणी तसेच मतदान या प्रक्रियेपासून वंचित राहणार आहे. यासाठी 2004 पूर्वीचे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या अंतर्गत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतलेले, परंतु नैसर्गिक कालावधीप्रमाणे 2004 व नंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याची पदवी संपादन केलेले,

सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी अशांची मतदान नोंदणी करण्यात यावी, असे आमचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या सद्यस्थितीतील निर्णयामुळे हजारो विद्यार्थी हे मतदान प्रक्रियेपासून तथा मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील. कृपया याबाबत आपण घेतलेला नियमांचा आधार व आपली भूमिका विषद करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Back to top button