नगर महानगरपालिका हद्दीत 2886 फेरीवाले | पुढारी

नगर महानगरपालिका हद्दीत 2886 फेरीवाले

नगर : पुढारी वृत्तसेवा : पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर शहराच्या हद्दीतील फेरीवाल्याचे (पथविक्रेते) बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे 2886 फेरीवाले असल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रारूप यादी निश्चित केली असून, त्यार एक महिन्यात हरकती मागविल्या आहेत.

पथविक्रेत्यांसाठी अधिकृत हॉकर्स झोन ठरविण्यासाठी सुरूवातीला शहरातील पथविक्रेत्यांचा सर्वेक्षण करण्यात आले. संबंधित संस्थेने शहरातील प्रत्येक भागात जाऊन फेरीवाल्याचे बायोमेटिक थम, आधार लिंक करून यादी तयारी केली आहे. पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले. त्यात कापड बाजारातील कापड, कटलरी, चप्पल याचे विक्रेते, तर फळ, ज्यूस, वडापाव, चहा, भजी विके्रत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात 17 प्रभागामध्ये सुमारे 2886 फेरीवाले असून, रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री करून ते कुटुंंबाची उपजीविका भागवित आहेत.

दरम्यान, याबाबत आज महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पथविक्रेता समितीची बैठक झाली. त्यात 2886 फेरीवाले सर्वेक्षण आढळले असून, त्यांची अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे, तसेच त्यांची प्रारूप मतदार यादी तयार करणे, शहर पथविक्रेता समितीची स्थापना करणे आदी निर्णय घेण्यात आले असून, त्यावर 30 दिवसांच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. याबैठकीला शाकीर शेख, संजय झिंजे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते.

Back to top button