पंढरपूर : विठ्ठल कारखान्यात १८ वर्षानंतर सत्तांतर, भगीरथ भालकेंना पराभवाचा मोठा धक्का | पुढारी

 पंढरपूर : विठ्ठल कारखान्यात १८ वर्षानंतर सत्तांतर, भगीरथ भालकेंना पराभवाचा मोठा धक्का

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे यांच्या व युवराज पाटील गटाचा दारुण पराभव झाला आहे. धाराशिव करखान्याचे चेअरमन व डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. कारखान्याच्या इतिहासात 18 वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. या सत्तांतरामुळे पंढरपूर तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून विठ्ठल कारखान्याची ओळख आहे. या कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी चांगलाच जोर लावला होता. सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक विरोधक असलेले अभिजित पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून 1677 मतांच्या आघाडीने 20 जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातून समाधान काळे हे विजयी झाले आहेत. भालके- काळे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर युवराज पाटील गटाने चांगली लढत दिली मात्र त्यांना एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

१८ वर्षानंतर विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर

राष्ट्रवादी काँग्रेसचे  दिवंगत आमदार भारत भालके यांची गेल्या १८ वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. नुकत्याच झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. सलग दोन मोठया पराभवांना त्यांना सामोरे जावे लागले आहे, तर कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे

काल बुधवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली होती.ती गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. 24 तास मतमोजणी सुरू राहिली. यात सुरुवातीपासूनच अभिजीत पाटील गटाने भालके -काळे व युवराज पाटील गटावर आघाडी घेतली होती. रात्रभर मतमोजणी झाल्यानंतर गुरुवारी सकाळी निवडणुकीचे  चित्र स्पष्ट झाले. यामध्ये कारखान्याच्या 6 ऊस उत्पादक गटातून 1677 मतांची आघाडी घेत अभिजित पाटील गटाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button