सोलापूर : ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना...’ | पुढारी

सोलापूर : ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना...’

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 343 शिक्षकांनी उमेदवारी विविध संघटनांच्या पाठबळावर अर्ज दाखल केले आहे. निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या तीन प्रमुख संघटनांत सत्ता काबीज करण्यासाठी हातमिळविणी करुन आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना…’, अशीच गत या प्रमुख संघटनांच्या पदाधिकार्‍यांची झाली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी 11 जुलैपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी सत्तेसाठी तीन प्रमुख संघांत आघाडी होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीनिमित्ताने काही पदाधिकारी व्यस्त असल्याने आघाडीबाबत निर्णय घेताना विलंब होताना दिसून येत आहे.

या निवडणुकीत पतसंस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिवाजीराव पाटील, संभाजी व आदर्श शिक्षक समिती यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. शिक्षक समिती व जुनी पेन्शन समिती या दोन संघटनांत युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक लागली तर शिवाजीराव पाटील, संभाजी व आदर्श शिक्षक संघ विरुध्द शिक्षक समिती, जुनी पेन्शन संघटना, अशी लढत होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस 11 जुलै असल्याने 8 जुलैपर्यंत आघाडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याचदिवशी बहुतांश शिक्षकांचे अर्ज माघार घेतले जाण्याची शक्यता आहे.  सोमवारी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button