सांगोला : अजित पवार यांचाच शिवसेना संपविण्याचा कट; आमदार शहाजीबापू पाटील | पुढारी

सांगोला : अजित पवार यांचाच शिवसेना संपविण्याचा कट; आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे भेटतही नव्हते आणि वेळही देत नव्हते. आमदारांची कामे जाणूनही घेत नव्हते. संजय राऊत हे शिवसेनेमधील नारदमुनी आहेत. ते कोणालाही सरळ बोलत नव्हते. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात निधी नेऊन शिवसेनेला संपवण्याचा त्यांनी कट रचला होता. त्याचबरोबर शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कोणाच्याही हाती लागत नाहीत. ते फक्त केळ दाखवून आमदारांना व पदाधिकाऱ्यांना आशा दाखवत होते. ह्या सर्व गोष्टी आमच्या डोळ्यादेखत घडत होत्या. याचीच सल मनात धरून शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही सर्वांजण एकत्र आलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुजरात-गुवाहाटी-गोवा व पुन्हा मुंबईत आलो. भाजपने आम्हाला मोठ्या मनाने पाठिंबा दिल्याने आम्ही सरकार बनवू शकलो. हे सरकार अडीच वर्षेच काय पंधरा वर्षे राहील असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला येथील जाहीर सभेच्या वेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवल्यावर आमदार शहाजी बापू पाटील हे सांगोला येथे जाहीर सभेसाठी आले होते. सहा वाजण्याच्या सुमारास महुद येथे शहाजी बापू पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

जाहीर सभेच्या वेळी आमदार पाटील म्हणाले की टायगर अभी जिंदा है, कोणी काहीही म्हणाले तरी आम्ही कट्टर शिवसैनिक असून शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून सांगोला तालुक्याचा शेतीविषयक प्रश्न, पाण्याचा व सर्वांगीण विकास करण्यासाठी मी शिंदे साहेबांच्या पाठीमागे गेलो आहे. येत्या अडीच वर्षात सांगोला तालुका हा बारामती सारखा विकसनशील व सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पुढील अडीच वर्षच काय तर पंधरा वर्षे सत्तेमध्ये राहू. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे ८० हून अधिक आमदार हे सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या पाठीमागे गेलो आहे. यासाठी सांगोल्यातील जनतेने विकास पाहण्यासाठी माझ्या पाठीमागे उभे राहावे.

यावेळी व्यासपीठावर रफिक नदाफ, भाऊसाहेब रुपनर, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह, केदार गुंडा खटकाळे, सागर पाटील, संभाजी आलदर, शहाजी नलवडे, सुभाष इंगोले, दत्तात्रय सावंत, शिवाजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक विविध गावचे नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button