पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 22 रेशन दुकाने | पुढारी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 22 रेशन दुकाने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीणलगतच्या भागातील सध्या रद्द असलेली, यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे आवश्यक असलेली 22 रास्तभाव दुकाने मंजूर केली जाणार आहेत. त्यासाठीचे अर्ज 31 जुलैपर्यंत स्वीकारले जाणार असून, मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड व लगतच्या ग्रामीण भागामधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परिमंडळ ‘क’ मध्ये पाटील इस्टेट, शिवाजीनगर, अशी दोन, परिमंडळ ‘ई’ मध्ये भारतनगर व शांतीनगर, परिमंडळ ‘फ’ मध्ये कुदळवाडी गावठाण, भोसरी खालील गव्हाणे वस्ती, तळेगाव खालील सहयोग नगर, रुपीनगर भाग, पिंपरी खालील मासुळकर कॉलनी, अजमेरा वास्तुद्योग कॉलनी, चर्‍होली बुद्रुक गावठाण खालील काळजेवाडी, ताजणेमळा, कोतवालवाडी, पठारे वस्ती, निगडी गावठाण अशी सहा स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत.

परिमंडळ ‘ह’ मध्ये दत्तवाडी, अप्पर इंदिरानगर, पर्वती दर्शन व पायथा अशी तीन, परिमंडळ ‘ज’ मध्ये गांधीनगर, भाटनगर, खराळवाडी अशी तीन, परिमंडळ ‘ल’ मध्ये कोथरूड, परिमंडळ ‘म’ मध्ये कोंढवे धावडे, खडकवासला, बालाजीनगर, धनकवडी, श्रीरामनगर (स्वतंत्र महसुली गाव, ग्रामपंचायत), कुडजे (स्वतंत्र महसुली गाव, ग्रामपंचायत), खामगाव मावळ अशी सहा याप्रमाणे एकूण 22 स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांनी रास्तभाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button