नगर : हजारेंच्या संस्थांचा माहिती देण्यास नकार | पुढारी

नगर : हजारेंच्या संस्थांचा माहिती देण्यास नकार

जवळा : पुढारी वृत्तसेवा : शासकीय अनुदान लागू होत नसल्याचे कारण देत माहिती अधिकार कायदा लागू होत नसल्याचे उत्तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संबंधित संस्थांनी माहिती अधिकारी कार्यकर्त्याला दिले आहे. ज्यांनी माहिती अधिकार कायदा लागू व्हावा यासाठी आंदोलन केली त्याच अण्णा हजारे यांच्या संस्थेने माहिती देण्यास नकार घंटा दर्शविल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संचलित काही सार्वजनिक संस्थांनी आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेच्यावतीने माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, स्वामी विवेकानंद कृतज्ञता ट्रस्ट, हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. परंतु या चारही संस्थांनी ‘आमच्या संस्थांना शासकीय अनुदान प्राप्त होत नसल्याने माहिती अधिकार कायदा 2005 चे प्रकरण 2 मधील पोट (कलम 3’ ज ’) नुसार आम्ही या कायद्याच्या कक्षेत बाहेर असल्यामुळे माहिती देता येणार नाही’ असे कळवले आहे.

माहिती अधिकार कायद्याचे जनक तसेच देशभर भ्रष्टाचारमुक्ती व पारदर्शकतेचा डांगोरा पिटणारे अण्णा हजारे यांनीच त्यांच्या संस्थांची माहिती नाकारून माहिती अधिकार कायद्याला हरताळ फासला आहे. माहिती अधिकार कायदा सर्वात प्रथम अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता. पुढे तो देशभर लागू करण्यात आलेला आहे.

                                                         – रामदास घावटे, माहिती अधिकारी कार्यकर्ते.

शासनाचे कारभारावर नियंत्रण असणारे किंवा अनुदान मिळणार्‍या संस्थांना माहिती अधिकार लागू होतो. या चारही संस्थांना शासकीय अनुदान मिळत नाही. अण्णांना मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या एफडीतून तसेच ट्रेनिंगसाठी आलेल्यांच्या निवास व्यवस्थेतून मिळालेल्या निधीवर संस्थेचा कारभार सुरू आहे. अण्णांना उगाचच बदनाम करण्यासाठी हा ‘उद्योग’ केला गेला आहे.

                                                                             – संजय पठाडे, स्वीय सहाय्यक.

Back to top button