वारी 2022 : एकसुरी, एकतारी, नियमबद्ध वारी आणि समाज आरती | पुढारी

वारी 2022 : एकसुरी, एकतारी, नियमबद्ध वारी आणि समाज आरती

माऊली पालखी सोहळ्यातील सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध, नियोजित, नियमबद्ध आणि अचूक वेळी होतात. सोहळ्यात सहभागी सुमारे 350 दिंड्यांमध्ये एकवाक्यता असते. सोहळा मुक्कामाला पालखी तळावर पोहोचल्यावर होणारी समाजआरती आणि तंबू उभारणी रचना हा सैनिकी शिस्तीचा उत्तम नमुना आहे. पालखी सोहळा सुरू करणारे हैबतबाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे सरदार असल्याने पालखी सोहळ्यावर सैनिक शिस्तीची छाप आहे. समाज आरती हा लोकशाही दिंडी सोहळ्याचा मानबिंदू म्हणावा लागेल.

संत तुकारामाच्या घराण्यात वारीची परंपरा अनेक वर्षांपासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव श्री नारायण बाबा यांनी 1685 मध्ये या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायांच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला नेत. त्याठिकाणी पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायणबाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडित सुरू होता.

आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये माऊलींचे निस्सीम भक्त हैबतबाबा पवार-आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार म्हणून असलेल्या हैबतबाबांनी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला.

सायंकाळी सहा ते सातदरम्यान पालखी तळावर पोहोचते. तळाच्या मध्यभागी माऊली पालखी ठेवण्यासाठी आलिशान तंबू तयार असतो. मानाच्या सर्व दिंड्या तळावर पोहोचल्यावर स्थानिक ग्रामस्थ पालखी नाचवतच तळावर आणून उंच ठिकाणी ठेवतात. या दरम्यान ‘माऊली…माऊली’ चा जयघोष आणि टाळ, मृदंगाच्या नादाने वातावरण फुललेले असते.

अचानक ‘हो..ऽऽ !’ असा प्रमुख चोपदार बाळासाहेब यांचा आवाज येतो आणि एका क्षणात सर्व काही शांत होते. सारे टाळ बंद होतात. मृदंग वाजवणे थांबते. कोणीही बोलत नाही. ज्या दिंडी मालकाची अडचण असेल, दिवसभर त्यांना त्रास झाला असेल, तर त्याच दिंड्या टाळ वाजवत राहतात. चोपदार स्वत: किंवा त्याचे प्रतिनिधी अडचण असलेल्या दिंडी मालकाकडे जातात. त्यांच्या अडचणी, तक्रार ऐकून घेतात. शक्य त्या समस्या जागेवरच सोडवल्या जातात, शक्य नसेल, तर नंतर तळावर बोलवले जाते. दुसर्‍या दिवसाचे नियोजन केले जाते.

यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबाराय यांची समाज आरती होते. सर्व शिस्तबद्ध होते. आरती संपल्यानंतर सर्व दिंड्या आपल्या जागेवर जातात. दरम्यान, सोहळा मालकांचा तंबू उभारण्यात येतो. हा तंबू तयार झाल्याशिवाय इतर तंबू उभे केले जात नाहीत. हे तंबू कसे उभारावेत, हे पण निश्चित आहे. या तंबूच्या आठ खुट्यांवर इतर प्रमुखांचे काही तंबू उभारले जातात. या सोहळ्यावर सैनिकी शिस्तीचा पगडा असल्याचे सातत्याने जाणवत राहते.

सतीश मोरे 

Back to top button