सातारा : मारुल हवेली, मरळी गणात फेरबदल; मतदार संघातील लोकांचा संभ्रम दूर | पुढारी

सातारा : मारुल हवेली, मरळी गणात फेरबदल; मतदार संघातील लोकांचा संभ्रम दूर

मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. आता प्रभाग रचनेच्या फेरबदलानुसार मारूल हवेली जिल्हा परिषद गटातील मारूल हवेली पंचायत समिती गण व मरळी पं.स.गणातील समाविष्ट असलेल्या गावांचा बदल करण्यात आला आहे. सदर गावातील नागरिकांनी घेतलेल्या हरकतीनंतर ही आदालबदल करण्यात आली आहे.

यापूर्वी जाहिर झालेल्या रचनेनुसार मारूल हवेली जिल्हा परिषदेचा नवीन गट झाला आहे. या गटात मरळी व मारूल हवेली हे दोन पंचायत समिती गण तयार झाले आहेत. मरळी गणात मरळी, हुबंरवाडी, सुळेवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, गव्हाणवाडी, कुसरूंड, पवारवाडी, डावरी, धजगाव, आसवलेवाडी, भिलारवाडी, कळकेवाडी, टेळेवाडी, कोरीवळे, दिवशी बुद्रुक या गावांचा समावेश करण्यात आला होता. तर मारूल हवेली गणात मारूल हवेली, पापर्डे, चौगुलेवाडी, जरेवाडी, बहुले, गारवडे, नावडी, वेताळवाडी, सोनाईचीवाडी, चोपदारवाडी, सांगवड ही गावे समाविष्ट करण्यात आली होती.

वास्तविकता मरळी गणाला जवळची असणारी सांगवड, चोपदारवाडी, चौगुलेवाडी, सिद्धेश्वरनगर ही गावे मरळी गणाला जोडणे आवश्यक होते. तर मरळी गणाला जोडली गेलेली लांब अंतरावरील दिवशी बुद्रुक, कोरीवळे, टेळेवाडी ही गावे मारूल हवेली गणात समाविष्ट करणे योग्य ठरली असती. मात्र तसे न करता उलटसुलट पद्धतीने ही गावे दूरच्या गणात समाविष्ट केल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. तालुक्यातील राजकीय ईच्छुकांसह सर्वसामान्य जनतेत गोंधळाचे वातावरण होते.

याबाबत दिवशी बुद्रुक, कोरीवळे, टेळेवाडी, सांगवड, चौगुलेवाडी व सिद्धेश्वरनगर येथील नागरिकांनी प्रशासनाकडे हरकत घेतली होती. या हरकतीनुसार भौगोलिक सलग्नता, महसूली सजा, तलाठी कार्यालय, बँक, पोस्ट, महावितरण, अन्य कार्यालये, बाजारपेठ, संबधित भागाशी नियमीत व सततचा येणारा संपर्क,दळणवळणाच्या दृष्टीने, जवळचे व सोयीचे ठिकाण असे मुद्दे मांडून यावर आक्षेप घेतला होता. या हरकतीवर पुणे येथील आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली होती. विभागीय आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर मारूल हवेली व मरळी गणात फेरबदल झाले आहेत. मरळी गणातील कोरिवळे, टेळेवाडी, दिवशी बुद्रुक ही गावे मारूल हवेली गणाला जोडली आहेत. तर सांगवड,चोपदारवाडी, चौगुलेवाडी ही गावे मरळी गणाला जोडली आहेत.त्यानुसार आता मारूल हवेली गणात मारूल हवेली, पापर्डे, जरेवाडी, बहुले, गारवडे, नावडी, वेताळवाडी, सोनाईचीवाडी,खिलारवाडी कोरिवळे, टेळेवाडी, दिवशी बुद्रुक ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर मरळी गणात मरळी, हुबंरवाडी, सुळेवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, गव्हाणवाडी, कुसरूंड, पवारवाडी, डावरी, धजगाव, आसवलेवाडी, भिलारवाडी, कळकेवाडी, सांगवड, चोपदारवाडी, चौगुलेवाडी, सिद्धेश्वरनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Back to top button