सोलापूर : कोरोना काळात दाखल गुन्हे घेणार मागे | पुढारी

सोलापूर : कोरोना काळात दाखल गुन्हे घेणार मागे

सोलापूर : महेश पांढरे कोरोना संसर्गाच्या काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले हजारो खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील नवयुवक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे अधिकार स्थापन करण्यात आलेल्या क्षेत्रीय समित्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केलेेलेच गुन्हे मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना काळात 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 याकालावधीत भादंवि कलम 188 अन्वये, भादंवि कलम 188 सह साथरोग प्रतिबंध / आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह 269 किंवा 270 किंवा 271 सह साथरोग प्रतिबंध/ आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम, कलम 37 सह 135 अशा कलमान्वये विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर खटले दाखल करण्यात आले होते. कोरोना काळात सोलापूर शहर व जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनावतीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.

या आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याच्या तसेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून जवळपास 6 लाख 93 हजार 731 जणांकडून जवळपास 186 कोटी 27 लाख 2 हजार 702 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यापैकी दोन वेळा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी केली होती. यामध्ये जवळपास 8 ते 10 हजार लोकांवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ते गुन्हे आता माघार घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि युवकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. त्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व इतर ठिकाणी चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करुन हे खटले मागे घेण्यासाठी शासनाने राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याकरिता जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या क्षेत्रीय समितीला कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे.

विभाग केसेसची संख्या दंडाची रक्कम

सर्व तहसील        25343 4453450
नगरपालिका       11173 1602020
ग्रामीण पोलिस     334085 84077240
शहर पोलिस       286270 85709600
महापालिका        36860 10430392
एकूण                 693731 186272702

गुन्हे माघारीसाठी असे असणार नियम
कोरोना काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि खटले मागे घेण्याची कार्यवाही करताना ज्यामध्ये सरकारी नोकर व फ्रंटलाईन वर्कर यांच्यावर हल्ले झालेले नसावेत आणि ज्यामध्ये खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. याची खबरदारी घ्यावी, अशी अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. याची चौकशी करुनच पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. त्यामधील अटी व नियम लक्षात घेऊन गुन्हे माघारी घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.
– मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी, सोलापूर

Back to top button