सोलापूर : सराफ दुकानातून ग्राहकाच्या ४ तोळे पाटल्या चोरल्या | पुढारी

सोलापूर : सराफ दुकानातून ग्राहकाच्या ४ तोळे पाटल्या चोरल्या

सोलापूर : सोलापुरात बाजारपेठेत आणि सराफ दुकानांवर चोरट्यांची वक्रद‍ृष्टी वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथील लकी चौकात गणेश आपटे ज्वेलर्समध्ये खरेदीस आलेल्या महिलेच्या पर्समधून 1 लाख 60 हजार रुपयांच्या 4 तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या लांबविण्यात आल्या.

खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या तीन चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे सीसी टीव्हीमध्ये कॅमेराबद्ध झाले आहे. या प्रकरणी अतिश ज्ञानोबा शिरगिरे (वय 30 रा. सिध्देश्‍वर सोसायटी, मड्डीवस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सोलापूर शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. बुधवारी (दि. 18) पहाटेच्या सुमारास बुधवार बाझार येथील नंदाल ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी 18 तोळे सोन्याचे दागिने व 2 किलो चांदी असा 6 लाख 9 हजाराचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळीच पाच वाजण्याच्या सुमारास लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्समध्ये अतिश शिरगिरे व त्यांची आजी गजराबाई व आई प्रभावती शिरगिरे दागिने दुरूस्तीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तीन अनोळखी महिला व त्यांच्याबरोबर एक लहान मुलगासुध्दा दुकानात होते.

गर्दीचा फायदा घेवून त्या तीन महिलांनी अतिश शिरगिरे यांची आजी गजराबाई यांच्या काखेतील पर्समधून चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लांबविल्या. त्यानंतर त्या तिघी महिला दुकानातून निघून गेल्या. थोड्या वेळानंतर अतिश यांच्या आजीने पर्स तपासली असता त्यातील पाटल्या गायब होत्या. त्यामुळे पाटल्या चोरीस गेल्याचे लक्षात आले.

अतिश यांनी दुकानचालकांना सांगून तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावेळी त्या तीन चोरट्या महिला पर्समधून दागिने चोरताना दिसून आल्या. त्यानुसार अतिश यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Back to top button