आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच | पुढारी

आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा स्थानिक कार्यकर्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहेत. त्याअनुषंगाने आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहोत, असे स्पष्टीकरण पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांनी दिले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेनेवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेतील बंडाळी या गरमागरम विषयावर गल्ली ते दिल्लीपर्यंतची चर्चा होताना दिसत आहे. पुढील राजकीय समीकरणाचे अंदाज आणि शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या 25 वर्षांपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला व सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे सत्ताकेंद्र राहिलेली कुर्डूवाडी नगरपालिकेबाबतही चर्चा होऊ लागली आहे. बंडाच्या घडामोडीचा या बालेकिल्ल्यावर परिणाम होणार का? जिल्हा प्रमुख डिकोळेंची भूमिका काय? असे प्रश्‍न कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर डिकोळे यांनी स्पष्ट केले की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांच्या विचारानेच घडलो आहोत.

‘शिवसेना’ या चार अक्षरांमुळेच आमची ओळख झाली आहे. बंड केलेल्यांची नाराजी शिवसेना अथवा उद्धव ठाकरेंवर नाही. बंडाच्या घडामोडीनंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही. कुर्डूवाडी नगरपालिकेला मिळालेला भरघोस निधी एकनाथ शिंदेंकडून मिळाला, यावरुन तर्क-वितर्क लावले जाऊ नये. हा निधी शिवसेनेकडून पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंजूर झाला. कोणत्याही घडामोडी घडल्यातरी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूकीत शिवसेनेवर परिणाम होणार नाही. स्थानिक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचारांचे असल्याने त्यांच्यात कोणताही संभ्रम नाही.

Back to top button