चंद्रभागा वाळवंटात नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम | पुढारी

चंद्रभागा वाळवंटात नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी यात्रेची लगबग सुरु झाली आहे. येत्या 10 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून भाविकांना सेवासुविधा पुरवण्याच्या दृष्टीने कामे उरकण्यावर भर दिला जात आहे. भाविकांच्या दृष्टिने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या चंद्रभागा वाळवंटातील दगड, गोटे, मातीचे ढिगारे उचलण्याचे काम सुरु असून नदीपात्रात पडलेले खड्डे देखील बुजवण्यात येत आहेत.

आषाढी यात्रा सोहळा कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्तपणे साजरा होत आहे. त्यामुळे या सोहळ्याला सोळा ते सतरा लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे. पंढरपूर नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरु केली आहे. तर शहर व परिसरातील स्वच्छता करणयावरही भर दिला जात आहे. त्याचअनुषंगाने भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. त्या चंद्रभागा वाळवंटातही स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे.

नदीपात्रात पडलेले दगड, गोठे गोळा करुन बाजूला टाकण्याचे काम जेसीबी व टिपरच्या सहाय्याने केले जात आहे. त्याचबरोबर वेळोवेळी नदीपात्रात पडलेले खड्डे, तसेच अवैधवाळू उपसा करुन पाडलेले खड्डे बुजवण्याचे कामही करण्यात येत आहे. नदी किनारी उगवलेले गवत, काटेरी झुडपे काढण्यात येत आहेत. नदीकिनार्‍या लगतच्या नागरिकानी टाकेलेला कचरा उचलण्याचेही काम नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. याकरीता मुख्य आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक तोडकर यांच्यासह टीम काम करत आहे. या टीमकडून नदीपात्रातील कचरा, फाटकी कपडे, निर्माल्यवस्तूंची विल्हेवाट लावण्यात येत आहे. आषाढीची लगबग सुरु झाली असल्याने पंढरीत दररोज लाखोंच्या संख्येने वारकरी हजेरी लावत आहेत.

Back to top button