फुकट खाल्लं असेल, तर उधारी देऊन विषय संपवा | पुढारी

फुकट खाल्लं असेल, तर उधारी देऊन विषय संपवा

सांगोला : पुढारी वृत्तसेवा आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. त्यामुळे केलेल्या उपकाराची आणि खाल्लेल्या अन्नाची नेहमीच जाणीव ठेवली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व त्यांच्या सहकारी तसेच कार्यकर्त्यांनी वाढेगाव येथील मामा-भाचे हॉटेलवर फुकट खाल्ले असेल तर त्या हॉटेल मालकाची उधारी देऊन विषय संपवून टाकावा.

तो हॉटेल मालक काय करतो? कोणत्या पक्षाचा आहे? यापेक्षा त्याची जी असेल ती उधारी भागवून हा विषय त्याच दिवशी सदाभाऊ खोत यांनी संपवायला हवा होता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केला आहे.

गुरुवार, दि 16 जून रोजी सांगोला येथे आपल्या 2014 लोकसभा निवडणुकीत केलेल्या 66 हजार 445 रुपये इतक्या उधारीसाठी अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सांगोला दौर्‍यावर असलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पंचायत समिती समोर अडवून आपला हिशोब भागविण्यास सांगितले होते. यानंतर हा प्रकार संपूर्ण राज्यभर चांगलाच गाजला होता.

दरम्यान, या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल मालक अशोक शिनगारे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला होता.

याचा खुलासा करताना दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, 2017 रोजी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली होती. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी यांनीही शिनगारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे जाहीर केले होते.

तरीही, सदाभाऊ खोत यांनी लोकांची निव्वळ दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशोक शिनगारे याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही. असे दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगीतले.

Back to top button