औरंगाबाद : आता हजार लिटर पाण्याला वसूल करणार १४३ रुपये | पुढारी

औरंगाबाद : आता हजार लिटर पाण्याला वसूल करणार १४३ रुपये

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात मुख्य वितरिकेवरील सुमारे दीड हजार बड्या ग्राहकांना रोज बारा तास पाणी मिळते. त्यांच्या
या अमर्याद पाणीवापराला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने वॉटर मीटरचा पर्याय निवडला आहे. या ग्राहकांच्या नळांना वॉटर मीटर लावले जाणार असून त्यांना हजार लिटर पाण्यासाठी 143 रुपये या दराने पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे.

तीन महिन्यांपासून शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक वसाहतींमध्ये सहा ते सात दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो आहे, पण बड्या ग्राहकांची मात्र चंगळ सुरू आहे. ही चंगळ थांबवून, पाणीवापर मर्यादित करण्यासाठी आता त्यांच्या नळांना मीटर बसविले जाणार आहेत.

प्रभारी महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी त्याबाबतचे आदेश दिले. त्यानंतर मनपा प्रशासन लगेचच
कामाला लागले आहे. आता प्रत्येक प्रभागात बड्या ग्राहकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नळांना मीटर लावल्यानंतर त्यांना वार्षिक ठोक पाणीपट्टी आकारली जाणार नाही. त्याऐवजी त्यांना पाणी वापरानुसार मासिक किंवा त्रैमासिक बिल दिले जाईल. या पाणीवापरासाठी हजार लिटरला 143 रुपये असा दर राहील. त्यामुळे बड्या ग्राहकांना महिन्याला सरासरी दोन ते तीन लाख रुपये बिल आकारले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Back to top button