सोशल मीडिया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचे जितके फायदे आहेत त्याच प्रमाणात तोटेही समोर येताना दिसतात. सोशल मीडियावर असलेल्या अनेक बाबी मनोरंजन म्हणून ठीक असल्या तरी त्या कधी अफवेचं स्वरूप घेतील सांगता येत नाही.
मुख्य म्हणजे व्हायरल होत असलेल्या सगळ्या स्टोरी खऱ्या असतातच असं नाही. त्यातही समोर येणाऱ्या अफवा या अनेकदा त्याचाशी निगडित असलेल्या व्यक्तींना त्रासदायक ठरू शकतात. विशेषतः सेलिब्रिटींच्या मृत्यूसंबंधी व्हायरल होत असलेल्या अफवा. सोशल मीडियाच्या अवकृपेमुळे अनेक सेलिब्रिटींना जिवंत असतानाच स्वतःच्या मृत्यूच्या अफवेला सामोरं जावं लागलं.
असाच काहीसं घडलं आहे 'तारक मेहता का…' फेम अभिनेता मंदार चांदवडकर यांच्याबाबत. सोशल मीडियावरून मंदार यांच्या निधनाची बातमी व्हायरल झाली आणि त्याच्या चाहत्यांमध्ये दु:खाच वातावरण पसरलं. या बातमीची शहानिशा केली असता मंदारच्या मृत्युची बातमी केवळ अफवा असल्याचं समोर आलं. याशिवाय मंदारनेही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तो उत्तम असल्याचं शेअर केलं.
या व्हिडियोमध्ये मंदार म्हणतो की, 'माझी तब्ब्येत उत्तम आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की कोणत्याही अफवेला बळी पडू नका. मी सध्या शूटिंगमध्ये आहे. मी लवकरच लाईव्ह येईन. तोपर्यंत मी चाहत्यांना सांगू इच्छितो की माझी प्रकृती उत्तम असून चाहत्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नका. '
केवळ मंदारच नाही तर यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींना अशा प्रकारच्या अफवांचा सामना करावा लागला होता. अभिनेत्री दिव्या त्रिपाठीचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची अफवा समोर आली होती.
तर अभिनेता मुकेश खन्ना यांचाही कोविडमुळे मृत्यू झाल्याची अफवा समोर आली होती. मुकेश खन्ना यांनी लाइव्ह येत ही अफवा पसरवणाऱ्याचा खरमरीत शब्दात समाचार घेतला होता.
सुपर फिट अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याशी मृत्यूची अफवा व्हायरल झाली होती. यावेळी पती अभिनव कोहलीने या अफवांचं खंडन केलं होत.
मराठमोळे अभिनेते शिवाजी साटम यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची अफवा व्हायरल झाली होती शिवाजी साटम यांनी समोर येत या अफवेचं खंडन केलं होतं.