पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरसह 12 गावांत दि. 17 ते 25 जुलैपर्यंत नऊ दिवस प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. त्याला लोकप्रतिनिधी व व्यापारी यांचा विरोध पाहता यातून समन्वयाने मार्ग काढू. संचारबंदी कमी करण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
भरणे यांनी शुक्रवारी (दि. 9) आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे ही बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारीदरम्यान संचारबंदीचा कालावधी कमी करण्यासंदर्भात मुंबई येथे भेटून मागणी केली होती. आढावा बैठकीतही त्यांनी संचारबंदी कमी करण्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावे वारी अडवू नये. शिवाय शहराला वेठीस धरू नये.