सिंधू म्हणाली, सायना नेहवालनं माझं अभिनंदन केलं नाही! | पुढारी

सिंधू म्हणाली, सायना नेहवालनं माझं अभिनंदन केलं नाही!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तिचे अभिनंदन केले. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या म्हणण्यानुसार, तिची सहकारी आणि वरिष्ठ बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपले अभिनंदन केले नाही.

सिंधूने कांस्यपदक जिंकल्यानंतर व्हर्च्यअल प्रेस कॉन्फरस घेतली. त्यात तिला ‘तू जिंकल्यानंतर सायना नेहवाल आणि माजी प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याशी काही संवाद झाला नाही का, अथवा तुझे त्यांनी अभिनंदन केले नाही का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर सिंधू म्हणाली की, ‘पुलेला गोपीचंद यांनी माझे अभिनंदन केले. पण सायनाकडून कसलाही मेसेज आला नाही. अर्थात गोपी सरांनी मात्र मला शुभेच्छा दिल्या. मी सोशल मीडियावर काही पाहिलेले नाही. मी हळूहळू प्रत्येकाला उत्तर देत आहे.’

गोपी सरांनी मला मेसेज केला. सायनाने नाही. यावर मी अधिक काही बोलू शकत नाही, असेही सिंधूने पुढे म्हटले.

प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला.

सायना नेहवाल हिचे यशस्वी करिअर घडवण्यामध्ये गोपीचंद यांचा मोलाचा वाटा आहे. पण सायना गोपीचंद यांची अकादमी सोडून गेली होती.

त्यावेळी गोपीचंद यांनी सिंधूवर अधिक लक्ष केंद्रीत केल्यामुळे सायना त्यांची अकादमी सोडल्याची चर्चा झाली होती.

कांस्यपदक नावावर करीत इतिहास रचला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. पण तिने कांस्यपदक नावावर करीत इतिहास रचला.

तिने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला.

याआधी मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. आता सिंधूने भारताच्या खात्यात कांस्यपदक आणून सोडले आहे.

सिंधूचे कौतुक करताना तिचे वडील पी. व्ही. रामण्णा यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : तेजस्विनी सावंतची पुढारी साठी विशेष मुलाखत | Tokyo Olympic 2021

Back to top button