छोटासा कीटक पसरवतो घातक विषाणू | पुढारी

छोटासा कीटक पसरवतो घातक विषाणू

वॉशिंग्टन : कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांमध्ये विषाणूंबाबत दहशतच निर्माण झालेली आहे. त्यामुळे विषाणूंचा फैलाव कसा व कोणकोणत्या माध्यमांतून होतो याबाबत लोकांमध्ये कुतुहलही निर्माण झालेले आहे. एका कीटकाच्या माध्यमातूनही धोकादायक अशा एका विषाणूचा प्रसार होत असल्याचे अमेरिकेत दिसून आले आहे. ‘टिक’ नावाच्या या छोट्याशा कीटकामार्फत ‘हार्टलँड’ नावाचा विषाणू फैलावतो व त्यामुळे माणसाच्या शरीरातील अवयव निकामी होतात.

अशा कीटकाच्या माध्यमातून पसरणार्‍या विषाणूची काही प्रकरणे अमेरिकेच्या जॉर्जियात समोर आली आहेत. ‘टिक’ हे कीटक ढेकूण, गोचिड यांच्यासारख्या रक्त पिणार्‍या कीटकांसारखे असतात. त्यांच्या माध्यमातून माणसाला ‘हार्टलँड व्हायरस’चा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू यापूर्वी पांढर्‍या शेपटीच्या हरणात सापडला होता. 2009 साली मिसौरीमध्ये या विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले. त्यानंतर माणसांमध्येही हा विषाणू फैलावू शकतो याची पुष्टी 2013 मध्ये झाली. आता दर 2 हजार टिकपैकी एकामध्ये हा विषाणू असल्याचे दिसून आले आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, भूक न लागणे ही हार्टलँड विषाणूची लागण झाल्याची लक्षणे आहेत. या विषाणू संक्रमणावर कोणतेही औषध नाही.

Back to top button