जळगाव : 92 लाख 34 हजार किमतीचा 9 टन गुटखा जप्त | पुढारी

जळगाव : 92 लाख 34 हजार किमतीचा 9 टन गुटखा जप्त

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : उदयपूर राजस्थान येथून मुंबईकडे चाळीसगावमार्गे अवैध गुटखा मालाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून 92 लाख 34 हजार रुपये किमतीचा 9 टन गुटखा जप्त केला आहे.

चाळीसगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना  गुप्त माहिती मिळाली की, उदयपूर राजस्थान येथून मुंबईकडे चाळीसगाव मार्गे अवैध गुटखा मालाची वाहतूक होत आहे, या माहितीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोना नितीन अमृतकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार पोहेकॉ युवराज नाईक, पोना भूपेश वंजारी, पोना प्रेमसिंग राठोड यांनी मालेगाव रोड येथे नाकाबंदी लावून बेलगंगा साखर कारखान्याच्या पुढे रोडवर कंटेनर (एच आर 38 ए बी 2190) पकडला.

त्यावरील मालकास विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरला प्लास्टिकचे सील लावण्यात आले होते. परंतु पोलिसांची बातमी पक्की असल्याने त्यानी रात्री साडेबाराच्या सुमारास कंटेनर पोलीस स्टेशनला आणून लावले. सकाळी शासकीय पंचांसमक्ष कंटेनर उघडून पाहणी केली असता त्यात एकूण 150 प्लास्टिक बारदाण्यात 92 लाख 34 हजार रुपये किमतीचा 9 टन गुटखा 20 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 1 कोटी 12 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदर, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार. पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन अमृतकर, पोना गोवर्धन बोरसे, पोना शांताराम पवार, पोना भूपेश वंजारी, पोना प्रेम सिंग राठोड यांच्या पथकाने केली आहे. पोना गोवर्धन बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोना शांताराम पवार हे करत आहेत.

Back to top button