कोल्हापूर : घडलंय... बिघडलंय | पुढारी

कोल्हापूर : घडलंय... बिघडलंय

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सारे एका सुरात ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत होते. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्यात ‘बिघडलंय’ हे समोर आलंय. त्याला कारणही तसंच ठरलंय. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी, ‘आमचं ठरलंय म्हणून गृहीत धरू नका, आता नवीनच ठरलंय, ते टोकाला नेणार,’ असे सांगून गृहीत धरणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना थेट आव्हान दिले.

या सार्‍याला कारण ठरलंय ती जिल्हा बँकेची निवडणूक. हसन मुश्रीफ यांना आपल्या मैत्रीपोटी तसेच मतदारसंघातील जोडण्या म्हणून विनय कोरे सोबत हवे होते. पण कोरे यांना बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर नको होते. अखेर त्यांच्यात फाटाफूट झाली आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांच्या पाठीमागे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक ठामपणे उभे राहिले.

गेली दोन वर्षे मंडलिकही आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व शोधत होते. त्यापूर्वी मंडलिक यांच्यावर ते शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत जास्त असतात, अशी टीका काही शिवसेना नेत्यांनी केली होती. या तक्रारी थेट ‘मातोश्री’पर्यंतही गेल्या होत्या. त्यामुळे गळ्यावरचं हे काँग्रेस, राष्ट्रवादीचं ओझं झुगारून देण्याची संधी मंडलिकही शोधत होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांना सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी न दिल्याने ही संधी मंडलिक यांना चालून आली. त्याचा त्यांनी फायदा उठविला.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी घोषणा करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याशी मंडलिक यांचा सामना झाला तेव्हा महाडिक यांच्या प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी पण ध्यानात ठेवलंय’ असं सांगून खळबळ उडवून दिली होती. अखेर मंडलिक निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना आपण स्वतःच निवडून आल्याचा आनंद झाला.

त्यानंतरच्या अनेक कार्यक्रमांत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेतच शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक दिसू लागले. मात्र, जिल्हा बँकेची सत्ता येताच त्यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणून गृहीत धरता काय? आता आमचं नवीनच ठरलंय आणि ते टोकाला नेणारच, असं सांगून काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

‘नवीनच ठरलंय’ यातून नवा डाव कोणता?

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, साखर कारखाने, महापालिका या सार्‍या निवडणुका पक्ष आपापल्या ताकदीने लढविणारच. मात्र, ‘नवीनच ठरलंय’ या मंडलिक यांच्या घोषणेनं ‘आमचं ठरलंय’ हे मात्र बिघडलं. हे ‘नवीनच ठरलंय’ यातून ते कोणता नवा डाव मांडणार, याची चर्चा सुरू आहे.

Back to top button