शेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच | पुढारी

शेलगावात शेतकर्‍याचा खून चुलत भावाकडूनच

करमाळा ; पुढारी वृत्तसेवा : शेलगाव (ता. करमाळा) येथे बुधवारी झालेल्या शेतकरी भारत सोमनाथ माने (वय 57) यांच्या खून प्रकरणी चुलत भाऊ आण्णा सोपान माने (वय 60, रा. शेलगाव वीराचे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भारत माने यांचा मुलगा प्रदीप माने (वय 25, रा. कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे, मूळ गाव माने वस्ती शेलगाव) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत माहिती अशी की, खून झालेले माने हे शेलगाव येथे शेती करतात. त्यांची पत्नी मुलगा प्रदीप यांच्याकडे कळाशी (इंदापूर) येथे राहते. माने यांना दारू पिण्याची सवय होती. त्यांना समजावून सांगितल्यास ते चिडचिड व शिवीगाळ करत. दीड महिन्यापूर्वी मुलगा प्रदीप व त्याची आई शेतातील तुरी काढण्यासाठी शेलगाव येथे भारत माने यांच्याकडे आले होते. ते 3 ते 4 दिवस राहून ते परत गेले, तर आई 10 ते 12 दिवस भारत माने यांच्याकडेच राहिली. अधूनमधून त्यांची फोनवर ते चौकशी करत होते.

माने स्वतःचा स्वयंपाक स्वत:च करून जेवत होते. शेतीसोबत 4 ते 5 शेळ्या, 2 म्हशी व 1 गाय ते सांभाळत होते. बुधवारी (ता. 19) सकाळी 11 वाजताच्या सुमारास नातेवाईक महेश सोरटे (रा. देवीचामाळ) यांनी प्रदीप यांना फोन करून वडील भारत यांचा रात्री झोपलेल्या जागेवरच मृत्यू झाला कळविले. सकाळी काही व्यक्तींना हा माने यांचा मृतदेह दिसला. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांच्या गळ्यात टॉवेल बांधलेला होता.

दरम्यान, त्यांच्या प्रेतावर शेतात अंत्यसंस्कार केले. त्यानंतर गावातील शेजारी- पाजारी व नातेवाईक यांना प्रदीप याने विचारपूस केली. भारत माने राहात असलेल्या वस्तीजवळच चुलत काका अण्णा माने हे पण एकटेच राहतात. अण्णा व भारत माने यांची घरे व जमिन शेजारी-शेजारी असल्याने त्यांचे नेहमी बोलणे चालणे होते. एकत्र फिरणे होते. परंतू भारत माने यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अण्णा माने काहीच बोलत नाहीत. उलट इतर नातेवाईकांना व गावकर्‍यांना त्यांच्या वस्तीकडे जावू नका, घडलेली घटना आपल्यावर येईल, अशी भाषा वापरत होते, असे प्रदीप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

प्रत्यक्षात भारत माने यांच्या मृत्यूच्या घटनेबाबत अण्णा यांनी शेजारी राहूनही प्रदीप व गावातील कोणासही कळविले नाही. उलट सकाळी ते शेलगाव येथे निघून गेले होते. इतर लोक भारत माने यांच्या वस्तीवर जमा होवू लागल्याने अण्णा सुद्धा उशीरा भारत माने यांच्या मृतदेहाजवळ आले. त्यामुळे शेजारधर्म असल्याने व शेजारी-शेजारी शेती, भावकी असूनही अण्णा माने यांनी कोणासही कळविणे टाळले. त्यामुळे कोणत्यातरी कारणावरून माझे अण्णा व भारत यांच्यात वाद झाला असेल . त्या वादाचा मनात राग धरून अण्णा यांनीच भारत यांना ठार मारल्याचा संशय आहे, असे प्रदीप याने फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button