

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया- युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करु शकतो, अशी भीती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी व्यक्त केली आहे. ( Ukraine war ) दरम्यान, २३ फेब्रुवारी हा दिवस रशियन सैन्यदल दिन आहे. त्यामुळे या दिवशीही युक्रेनवर मोठा हल्ला होईल, असे मानले जात आहे.
२४ फेब्रुवारी रोजी युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेजवळ रशियाने पाच लाख सैनिक तैनात केले आहेत, असा दावा आलेक्सी रेझनिकोव्ह यांनी केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये सीमेवर तीन लाखांहून अधिक सैनिक तैनात केले होते. दरम्यान, अमेरिकेतील 'इन्स्टिट्यूट स्टडी ऑफ वॉर'ने म्हटले आहे की, रशिया लवकरच युक्रेनच्या पूर्व भागावर मोठा हल्ला करु शकतो. रशियाने कितीही मोठा हल्ला केला तरी त्यास सडेतोड उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असेही रेझनिकोव्ह यांनी म्हटले आहे.
सध्या युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह हे शस्त्रात्र खरेदीसाठी फ्रान्सच्या दौर्यावर आहेत. युक्रेन फ्रान्सकडून २०० हवाई सुरक्षा रडार्स खरेदी करणार आहे. अलिकडेच अमेरिका, जर्मनी आणि इंग्लंडने युक्रेनला रणगाडा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, युक्रेन गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सैनिकाला डोनबास परिसरावर कब्जा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या याच परिसरात रशियन आणि युक्रेन सैनिकांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसात युद्ध आणखी तीव्र होईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :