

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पहिल्या दिवसाच्या खेळात 173 धावांवर नाबाद राहिलेल्या यशस्वी जैस्वालने येथे दुसर्या दिवशी द्विशतक झळकावण्याची अपेक्षा होती. मात्र, यात केवळ 2 धावांची भर घातल्यानंतर दिवसातील आठव्याच चेंडूवर जैस्वाल धक्कादायकरीत्या धावचीत झाला आणि यामुळे यात चूक कोणाची असा प्रश्न निर्माण झाला.
जैस्वालने यावेळी चेंडू मिडऑफकडे फटकावत चोरट्या एकेरी धावेसाठी कॉल दिला आणि गिल थोडा पुढेही आला. मात्र, नंतर त्याने अचानक जैस्वालला मागे जाण्यास सांगितले. यावेळी जैस्वाल इतका पुढे आला होता की, त्याला वेळेत मागे परतणे शक्यच नव्हते आणि त्याला धावचीत होत परतावे लागले. ज्येष्ठ समालोचक अनिल कुंबळे यांनी याचे समालोचन करत असताना यात चूक सर्वस्वी जैस्वालची असल्याचे नमूद केले.
2 : कसोटी क्रिकेटमधील पहिल्या 7 पैकी 5 शतकांचे दीडशतकात रूपांतर करण्यात जैस्वालपूर्वी केवळ दोनच फलंदाजांना यश मिळाले. यात बॉब सिम्पसन व ब्रायन लारा यांचा समावेश आहे.
3 : एखाद्या कसोटी डावात पहिल्या पाचही विकेटस्करिता किमान अर्धशतकी भागीदारी नोंदवली जाण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीत तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत भारताने असा पराक्रम गाजवला होता.
5 : कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालने 150 किंवा त्याहून अधिक धावा जमवण्याची ही पाचवी वेळ ठरली. वयाची 24 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी केवळ ब्रॅडमन (8) यांनीच जैस्वालपेक्षा अधिक दीडशतके झळकावली होती.
7 : आतापर्यंत खेळलेल्या 26 कसोटी सामन्यांत जैस्वालने 7 शतके झळकावली आहेत. या निकषावर त्याने ग्रॅहम स्मिथशी बरोबरी साधली. स्मिथने देखील आपला 24 वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी सलामीवीर या नात्याने 7 शतके झळकावली होती. एकूण विक्रमांचा विचार करता ब्रॅडमन (12), सचिन तेंडुलकर (11) व गॅरी सोबर्स (9) या तिघाच फलंदाजांनी वयाची 24 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 7 हून अधिक शतके झळकावली आहेत.
318 : भारताच्या पहिल्या डावात विंडीजच्या जलद गोलंदाजांनी 318 चेंडू टाकले. मात्र, यात त्यांना एकही बळी घेता आला नाही. विंडीजच्या गोलंदाजांवर 300 पेक्षा अधिक चेंडू टाकलेले असताना एकही बळी न मिळवण्याची अशी नामुष्की येण्याची ही तिसरी वेळ होती.
518 : भारताची पहिल्या डावातील 5 बाद 518 ही एकाही बाय किंवा लेग बायशिवाय, कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी एकाही बाय-लेगबायशिवायची सर्वोच्च धावसंख्या 513 इतकी होती. बांगला देशने श्रीलंकेविरुद्ध 2018 मधील चत्तोग्राम कसोटीत हा पराक्रम केला होता.