

AUS vs WI 1st Test | वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्या भेदक मार्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर १५९ धावांनी विजय मिळवला. हेजलवूडने आपल्या कसोटी कारकिर्दीत १३व्यांदा डावात पाच बळी घेण्याची किमया केली. नॅथन लायनने दिवसाच्या शेवटच्या षटकात २ बळी घेत तिसर्या दिवशी सामना संपवला.
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८० धावांवर बाद झाला. सर्वाधिक ५९ धावा ट्रॅव्हिस हेडने केल्या. वेस्ट इंडिजच्या जेडेन सील्स आणि शमार जोसेफ यांनी नऊ बळी घेतले. वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवशी १० धावांची आघाडी मिळवली आणि अखेर १९० धावा केल्या होत्या. मात्र दुसर्या डावात ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर आणि अॅलेक्स कॅरी यांनी केलेल्या अर्धशतकांमुीळे ऑस्ट्रेलियाने ३०१ धावापर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त ३३.४ षटकांत १४१ धावांतच गारद झाला.
बार्बाडोसची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पहिल्या दोन दिवसांमध्येच स्पष्ट झाले. कारण पहिल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २४ बळी पडले होते. यजमान वेस्ट इंडिजने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. एकेवेळी संघाची धावसंख्या १ गडी बाद ४७ अशी होती. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या भेदक मार्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. १ बाद ४७ अशा अवस्थेत असताना पुढील ९ धावांतच वेस्ट इंडिज संघाने ४ गडी गमावले. अवघ्या ५६ धावांवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
तिसऱ्याच दिवशी सामना संपवण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न होता. वेस्ट इंडिजचा डाव गडगडायला सुरुवात झाली. ६१ धावांवर सहावा, ७३ धावांवर सातवा आणि ८६ धावांवर आठवा गडी बाद झाला. यानंतर जस्टिन ग्रीव्हज (३८) आणि शामर जोसेफ (२२ चेंडूंत ४४) यांनी किल्ला लढवला. या दोघांमध्ये नवव्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी झाली. अखेर, नॅथन लायनने दिवसाच्या शेवटच्या षटकात शामर जोसेफ आणि जेडन सील्स यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. अन्यथा ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दोन गड्यांसाठी चौथ्या दिवशी पुन्हा मैदानात उतरावे लागले असते. तिसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजने आपले सर्व १० गडी गमावले.