पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिकमध्ये वेगवान धावणे आणि जमैकाचे ॲथलीट हे एक समीकरण आहे. याच देशाचा उसेन बोल्ट हा आजही जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे. त्याचे कारणही तसेच आहे युसेन बोल्ट याच्या नावावर १०० मीटर (९.५७ सेकंद) आणि २०० मीटर (१९.१९ सेकंद) धावण्याच्या शर्यतीतील वैयक्तिक विक्रम आहे. तसेच जमैका संघातील इतर धावपटूंसोबत ४ x १०० मीटर रीले शर्यतीमधील विश्वविक्रम (३६.८५ सेकंद) बोल्टच्या नावे आहेत. त्यामुळे यंदाच्या पॅरीस ऑलिम्पिकच्या ( Paris Olympics 2024) पुरुष १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सर्वांच्या नजरा जमैकाच्या ॲथलीट किशाने थॉम्पसन ( kishane thompson) याच्यावर वर होत्या. मात्र बोल्टचा वारसा पुढे चालविण्यात थॉम्पसन अपयशी ठरला. नोहा लायल्स (Noah Lyles) याने पुरुषांची १०० मीटर शर्यत जिंकत सुवर्ण पदकावर अमेरिकेची मोहोर उमटवली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या १०० मीटर स्पर्धेत नोहा लायल्स ( Noah Lyles) याने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ ऑगस्टला झालेल्या शर्यतीत अमेरिकन धावपटूने जमैकाच्या किशाने थॉम्पसनला अगदी कमी फरकाने पराभूत करून अव्वल स्थान पटकावले. थॉम्पसनच्या ९.७८९ सेकंदांपेक्षा केवळ ०.००५ जास्त असलेल्या लायल्सने ९.७८४ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले. तर थॉम्पसनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने या स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले. रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अकाने सिम्बाइन चौथ्या स्थानावर राहिला. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन इटलीचा जेकब लोमंट मार्सेल पाचव्या स्थानावर राहिला.
पुरुषांच्या 100 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकणारा जस्टिन गॅटलिननंतर नाेहा लायल्स ( Noah Lyles) हा पहिला अमेरिकन ॲथलीट आहे. गॅटलिनने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. लायल्सने वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ९.७८४ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थॉम्पसनने ९.७८९ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. लायल्स आणि थॉम्पसन यांच्यात केवळ ०.५ सेकंदाचे अंतर होते. तर कांस्यपदक जिंकणाऱ्या केर्लीने ९.८१० सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान पटकावले.
नोहा लायल्सने गेल्या वर्षी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 100 मीटर आणि 200 मीटर चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या. त्याने गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी उसेन बोल्ट २०० मीटरचा विश्वविक्रम मोडणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. मात्र या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकूनही तो बोल्टचा विक्रम मोडू शकला नाही. लायल्सने त्यावेळी 19.52 सेकंदाची वेळ घेतली होती, तर बोल्टच्या नावावर 19.19 सेकंदाचा विक्रम आहे.