Ranji Trophy | सिद्धेश-मुलानीची शतकी भागीदारी; मुंबई 5 बाद 336
श्रीनगर; वृत्तसंस्था : येथे खेळवल्या गेलेल्या रणजी स्पर्धेतील सलामी लढतीत कर्णधार शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखालील मुंबईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवसअखेर 5 बाद 336 धावा केल्या. जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजांनी मुंबईला सुरुवातीला झटके दिले. युवा सलामीवीर मुशीर खान तिसर्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. माजी कर्णधार अजिंक्य रहाणेही (27) मोठी खेळी करू शकला नाही.
अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड आणि अष्टपैलू शम्स मुलानी यांनी निर्णायक शतकी भागीदारी रचली. दिवसअखेर मुलानी 79 तर आकाश आनंद 15 धावांवर नाबाद राहिले. जम्मू-काश्मीरकडून युद्धवीर सिंह चाडक (2 बळी) आणि आकिब नबी (1 बळी) यांनी भेदक मारा केला. या सामन्यादरम्यान, स्कोअर कार्डवर काही काळ मुशीर खानऐवजी सर्फराज खानला शून्यावर बाद दाखवले गेले होते. यामुळे थोडा गोंधळ झाला.
नागालँडविरुद्ध विदर्भची दमदार सुरुवात
विदर्भाने नागालँडविरुद्ध 85 षटकांत 3 बाद 302 अशी दमदार सुरुवात केली. विदर्भाचा सलामीवीर अमन मोखाडेने 148 धावांवर नाबाद राहिला. त्याला ध्रुव शौरी (64 धावा) आणि यश राठोड (66*) यांनी मोलाची साथ दिली.
महाराष्ट्र संघाची पडझड; दिवसअखेर 7 बाद 179
महाराष्ट्र संघाची केरळविरुद्ध झालेली जोरदार पडझड धक्कादायक ठरली. महाराष्ट्राची दिवसअखेर 59 षटकांत 7 बाद 179 अशी दाणादाण उडाली. केरळच्या वेगवान गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या आघाडी फळीला अक्षरशः नेस्तनाबूत केले. मुंबईहून महाराष्ट्रात दाखल झालेल्या पृथ्वी शॉ आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला. महाराष्ट्राच्या पहिल्या 5 फलंदाजांपैकी 4 फलंदाज शून्यावर बाद झाले. यामुळे संघाची अवस्था अवघ्या 5 धावांवर 4 गडी अशी झाली होती. ऋतुराज गायकवाडने एकट्याने किल्ला लढवला. त्याने 11 चौकारांसह शानदार 91 धावा केल्या. जलज सक्सेनाने (49 धावा) त्याला चांगली साथ दिली. केरळकडून एम. डी. निधीशने 42 धावांत 4 बळी घेऊन महाराष्ट्राचे कंबरडे मोडले.

