

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतने द. आफ्रिकेच्या डी क्लर्कचा झेल घेतला आणि नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये इतिहास रचला. द. आफ्रिकेची कर्णधार वोल्वार्ड बाद झाल्यावर द. आफ्रिकेच्या आशा या फक्त डी क्लर्कवरच होत्या. कारण, हिनेच साखळी सामन्यात विशाखापट्टणमला भारतीय संघाकडून विजय हिसकावून घेतला होता. द. आफ्रिकेचे 9 गडी बाद झाले, तरी डी क्लर्ककडे एकहाती सामना फिरवायची ताकद होती. 1983 च्या विश्वचषकात एकहाती सामना फिरवू शकणार्या विव्ह रिचर्डस्चा झेल कर्णधार कपिल देवने घेतला आणि भारताच्या विजयाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आणि इथे कर्णधार हरमनप्रीतने झेल घेऊन नवा अध्याय रचला.
भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा संक्रमण घडले ते 1983 साली. कपिल देवने वेस्ट इंडिजची मक्तेदारी मोडून काढत विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटने कात टाकली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये असेच संक्रमण घडवणारा विजय हरमीनप्रीतच्या भारतीय महिला संघाने विश्वचषकावर नाव कोरून मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे महिला संघ अंतिम सामन्यात नसलेला हा पहिला विश्वचषक होता. यावरून या दोन देशांची महिला क्रिकेटमधील मक्तेदारी किती होती, हे दिसून येते. ऑस्ट्रेलियाचा काटा आपण दूर काढून अंतिम सामन्यात पोहोचलो तेव्हा भारतीय संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. या स्पर्धेत द.आफ्रिकेने आपल्याला साखळी सामन्यात हरवले होते, तरीही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड विरुद्ध खेळण्यापेक्षा द. आफ्रिकेविरुद्ध खेळणे आपण केव्हाही पसंत केले असते. भारतीय संघ गेली अनेक वर्षे विजेतेपदाच्या सीमारेषेवर घुटमळत होता; पण ती रेषा कशी पार करायची हे सूत्र त्यांना सापडत नव्हते. 2017 च्या अंतिम सामन्यात ‘लॉर्डस्’ला जिंकत असलेला सामना केवळ 9 धावांनी गमावल्याचे शल्य काय असते, हे त्या वेळेच्या संघातही असलेल्या हरमीनप्रीत आणि दीप्ती शर्मा बाळगून होत्या.
या विश्वचषकात साखळी स्पर्धेत तीन सामने सलग हरल्यावर भारतीय संघाचे मनोबल खच्ची होऊ शकले असते. विशेषतः, इंग्लंडविरुद्धचा सामना आपण जिंकण्याच्या स्थितीत असताना हरल्यावर आपण मोठ्या स्पर्धेत मोठे सामने जिंकू शकत नाही, अशी नकारात्मक भावना संघात पसरायला पूर्ण वाव होता; पण तसे झाले नाही. याचे श्रेय जाते ते प्रशिक्षक अमोल मुजुमदारला. स्वतःच्या क्षमतेवरचा पूर्ण विश्वास आणि सकारात्मकता अमोलने संघाला शिकवली. जेव्हा त्याने दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय संघ नुकताच विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतच बाहेर पडला होता. गेली दोन वर्षे संघातील खेळाडूंना आपल्या क्षमतेची जाणीव करून देऊन त्यांच्यातून उत्तम कामगिरी त्याने करून घेतली. भारतीय संघाला हा विजय अनेक द़ृष्टींनी अत्यावश्यक होता. कारण, या वेळी पराभव झाला असता, तर भारतीय महिला क्रिकेट नुसतेच निराश झाले नसते, तर काही वर्षे मागे गेले असते. संधीची वाट पाहणे म्हणजे काय असते, हे अमोल मुजुमदारने आपल्या आयुष्यात अनुभवल्याने मिळालेल्या संधीचा उत्तम उपयोग कसा करायचा हेही त्याला अवगत होते. त्याच त्याच चुका पुन्हा करून ती विजेतेपदाची रेष पार करता येणार नाही, हे त्याने इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर संघावर उत्तम बिंबवले. याचाच परिणाम म्हणून स्पर्धेतील शेवटचे तीन सामने जिंकताना भारतीय संघाने तारतम्य राखत कामगिरी केली. प्रत्येक वेळी कुणी वेगळी हिरॉईन जन्माला आली. न्यूझीलंड विरुद्ध प्रतीका रावल, स्मृती मानधना, उपांत्य फेरीत जेमिमा आणि अंतिम सामन्यात शफाली विजयाचे शिल्पकार ठरले.
मला या विश्वचषकाची तुलना 1983 च्या विजयाशी करावीशी वाटते. कारण, हा जसा तो विश्वचषक आपण कपिल देवच्या नेतृत्व गुणांमुळे जिंकला तसाच हाही विजय हरमनप्रीतच्या नेतृत्व गुणांचा होता. अंतिम सामन्यात पावसाचे विघ्न आले. सामन्याच्या दुपारपर्यंत पावसाचे विघ्न असल्याने सामना किती षटकांचा होणार, आऊटफिल्ड दमट असल्याने फिरकीपटूंना ओला चेंडू हाताळणे कितपत कठीण जाईल, या विचारांनी कुणीही कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार हे नक्की होते. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या ढगाळ हवेत थोडाफार स्विंग मिळणार होता. अशा महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर परिस्थितीला सामोरे जाताना हरमनप्रीतच्या सलामीवीरांकडून फक्त पॉवर प्ले नीट खेळून काढायच्या अपेक्षा होत्या. शफाली वर्मा या स्पर्धेचे पहिले काही सामने आपल्या घरी सोफ्यावर बसून बघत होती. जेव्हा प्रतीका रावल जायबंदी झाली तेव्हा सर्व संघ या धक्क्याने रडकुंडीला आला होता; पण त्याचबरोबर पुनरागमन करणार्या शफालीला संघात पुन्हा एकरूप करून घेण्याची किमया हरमनप्रीतला साधायची होती. निव्वळ बदली खेळाडू म्हणून समावेश झाला आहे, हे शफालीला वाटू न देता संघातील स्थान अमूल्य आहे, हे तिला वाटणे गरजेचे होते. उपांत्य सामन्यात शफाली अपयशी ठरली, तरी अंतिम सामन्यात तिला संघात कायम ठेवले. हा कर्णधाराचा विश्वास खेळाडूच्या द़ृष्टीने फार महत्त्वाचा असतो. एका बाजूने स्मृती बाजू लावून धरेल आणि दुसरीकडून शफाली फटकेबाजी करेल हा प्लॅन दोघींनी उत्तम निभावत शतकी भागीदारी केली. शफालीने भात्यातील सर्व फटके काढत निवड सार्थ ठरवली.
भारताच्या शतकी सलामी भागीदारीनंतर भारत सव्वा तीनशे धावा आरामात गाठेल, अशी अपेक्षा होती; पण द. आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी भारताची धावगती रोखली आणि मोक्याच्या क्षणी बळी मिळवत दुसरी मोठी भागीदारी होऊन दिली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाची शिल्पकार जेमिमाबरोबर 62 धावांची भागीदारी झाल्यावर शफाली बाद झाली. आदल्या चेंडूवर तिचा झेल थोडक्यात चुकला असताना पुन्हा तोच फटका मारून त्याच क्षेत्ररक्षकाकडे झेल देऊन बाद झाल्यावर पुन्हा पुन्हा त्याच चुका टाळायचा मंत्र भारतीय संघ विसरला की काय, असे वाटायला लागले. अचानक तीनशेचा टप्पा दूर दिसायला लागला; पण दीप्ती वर्माच्या दमदार फलंदाजीने भारताचा डाव सावरला. विजयी धावसंख्या असायला पंचवीस तीस धावा कमी पडल्या असे वाटत होते; पण हा अंतिम सामना असल्याने दडपण वेगळ्याच लेव्हलचे असते. जलदगती गोलंदाज रेणुका सिंग आणि क्रांती गौडला यश मिळत नाही, हे बघून कर्णधार हरमनप्रीतने चेंडू श्री चरनीच्या हाती सोपवला. कधी कधी क्रिकेटमध्ये एखादी चूक प्रतिस्पर्ध्याला सामन्यात परतायला मदत करते. चुकीची धाव घेताना टाझमिन ब्रिट्झ अमनज्योतच्या अचूक फेकीने धावबाद होत भारताला पहिले यश मिळाले. आपल्या फिरकीपटूंनी द. आफ्रिकेच्या फिरकीपटूंपेक्षा जास्त टर्न मिळवला आणि द. आफ्रिकेच्या डावातील निर्धाव चेंडू वाढायला लागले. श्री चरनी सुरेख गोलंदाजी करत असताना दुसरीकडून अमनज्योत किंवा राधा यादव मात्र अंकुश ठेऊ शकत नव्हते.
हरमनप्रीतचे नेतृत्व गुण पुन्हा इथे दिसून आले. शफाली वर्माचा जेव्हा संघात समावेश झाला तेव्हा तिला काही षटके टाकावी लागतील, याची जाणीव करून दिली होती. तिचा आत्मविश्वास इतका होता की, तिने कर्णधार आणि प्रशिक्षकांना वेळप्रसंगी दहा षटकेही टाकीन हा भरवसा दिला होता. एखादा साक्षात्कार व्हावा तसे हरमनप्रीतला शफालीचे हे बोल आठवले आणि तिने चेंडू शफालीच्या हातात ठेवला. याआधी 31 सामन्यांत मिळून शफालीने फक्त 14 षटके गोलंदाजी केली होती; पण रविवार तिचा दिवस होता. तिने घेतलेल्या दोन बळींनी सामन्याला कलाटणी मिळाली. हरमनप्रीतच्या नेतृत्व गुणांची अजून एक झलक म्हणजे, यश मिळाल्यावर तिने प्रांजळपणे शफालीला गोलंदाजी देताना काही विशेष योजना नव्हती, तर तिचा दिवस आहे म्हणून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, या भावनेने गोलंदाजी दिली, हे सांगितले. द. आफ्रिकेच्या फलंदाजीत दीपस्तंभ होता, तो कर्णधार वोल्वार्ड. तिने शतक झळकावूनही त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. या विजयाने भारतीय महिला क्रिकेटचे स्वरूप बदलून जाणार आहे. यांच्या प्रेरणेने आता भारताच्या कानाकोपर्यातून लाडक्या बहिणी मैदानात उतरायला तयार होतील. हा संघ मोठी स्पर्धा जिंकू शकतो आणि यांच्या सामन्यांना आता पुरुषांइतकीच गर्दी होते, हे बघून आता प्रायोजक अजून पुढे सरसावतील. जिल्हापातळीवर अनेक प्रशिक्षण केंद्रे उघडायला प्रायोजक मिळतील, ‘बीसीसीआय’ भरघोस मदत करेल. कुठच्या झुलन गोस्वामीला रोजचा काही अंतर प्रवास करून शहर गाठावे लागणार नाही. इतकी वर्षे भारतीय महिला संघ चांगलाच होता; पण एका मोठ्या विजयाचा टिळा लागायचा होता. तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्याचे मुहूर्त सुरू होतात. भारतीय महिला क्रिकेटच्या रणरागिणींनी तुळशीच्या लग्नाच्या मुहूर्तावरच महिला क्रिकेटच्या आगामी शुभ पर्वाची मंगलाष्टके या विश्वविजेतेपदाने म्हटली.