

ख्राईस्टचर्च : फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. इंग्लंडने 65 धावांनी वर्चस्वपूर्ण विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी निर्णायक आघाडी घेतली.
सॉल्ट (56 चेंडूंत 85 धावा) आणि ब्रूक (35 चेंडूंत 78 धावा) या दोघांनीही 69 चेंडूंमध्ये 129 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. इंग्लंडने उभारलेली 4 बाद 236 ही धावसंख्या हॅगली ओव्हल मैदानावरची नवीन विक्रमी टी-20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या ठरली. त्यांनी डावातील 10 चेंडू शिल्लक असतानाच 208 धावांचा पूर्वीचा विक्रम सहज मोडला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18 व्या षटकात 171 धावांवर सर्वबाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा मिचेल सँटेनरचा निर्णय हा पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होता. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांनी त्याच अंतिम अकरा खेळाडूंसह मैदानात उतरणे पसंत केले. मात्र, ब्लॅक कॅप्सच्या कर्णधारासाठी दुर्दैवाने ही खेळपट्टी इंग्लंडने पहिल्या सामन्यात 6 बाद 153 धावा केलेल्या खेळपट्टीपेक्षा अधिक फलंदाजीस अनुकूल होती.
इंग्लंड : 20 षटकांत 4 बाद 236 (सॉल्ट 85, ब्रूक 78)
न्यूझीलंड : 17.4 षटकांत सर्वबाद 171 (सायफर्ट 39, रशीद 4-32).