

कलांग; वृत्तसंस्था : सिंगापूरमधील नॅशनल स्टेडियममध्ये गुरुवारी रात्री झालेल्या एएफसी एशियन फुटबॉल चषक स्पर्धेच्या (2027) तिसर्या फेरीच्या पात्रता सामन्यात, रहीम अलीने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर भारताने यजमान सिंगापूरला 1-1 अशा गोल बरोबरीत रोखले. सामन्याच्या 90 व्या मिनिटाला रहीम अलीचा हा गोल केला. त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला.
सामन्याच्या पहिल्या हाफच्या स्टॉपेज वेळेत इख्सान फंडीने भारतीय बचावफळी भेदून गोल करत सिंगापूरला आघाडी मिळवून दिली. दुसर्या हाफच्या सुरुवातीलाच, भारतीय मध्यरक्षक संदेश झिंगनला फंडीला अवैधरीत्या रोखल्याबद्दल पंचांनी दुसरे पिवळे कार्ड दाखविले. त्यामुळे झिंगन सामन्यात बाहेर गेला. परिणामी, भारतीय संघाला दहा खेळाडूंवर खेळावे लागले. एक गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताला सामन्याच्या 90 व्या मिनिटाला रहीम अलीने गोल करत बरोबरी साधून दिली. सिंगापूरचा गोलरक्षक इझवान महबूदच्या चुकीचा फायदा घेत रहीमने चेंडूला जाळे दाखविले.
या बरोबरीमुळे तीन फेर्यांनंतर भारत दोन गुणांसह गु्रप सी मध्ये तिसर्या स्थानावर आहे, तर सिंगापूर दुसर्या स्थानावर घसरला आहे. याच गटात हाँगकाँगने बांगला देशवर 4-3 ने विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
सामन्यानंतर सुनील छेत्रीने सांगितले की, एशियन कप 2027 मध्ये पात्र होण्यासाठी अजूनही भारताकडे संधी आहे. भारताला आता उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील आणि इतर तीन संघांना गुण गमावण्याची आशा करावी लागेल, तेव्हाच एशियन कपमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळू शकेल. या दोन संघांमधील पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे.