पुढारी ऑनलाईन डेस्क : डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टोकियो येथील पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगत ( Pramod Bhagat) याच्यावर १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे तो आगामी पॅरिस पॅरालिम्पिक (Paralympics 2024) स्पर्धेला मुकणार आहे. या कारवाईमुळे भारताच्या पदकाचा आशेला मोठा धक्का बसला आहे.
अँटी डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रमोद भगत हा दोषी आढळला आहे. त्यामुळे आता त्याला पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होता येणार नाही, असे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF)ने आज (दि. १३) स्पष्ट केले. 1 मार्च रोजी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट (CAS) च्या डोपिंग विरोधी विभागाला प्रमोद भगत याने अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्याने CAS अपील विभागाकडे अपील केले होते; परंतु त्यांचे अपील 29 जुलै 2024 रोजी फेटाळण्यात आले. CAS अपील विभागाने 1 मार्च रोजी त्यांच्या निर्णयाची पुष्टी केली हाेती. ऑलिम्पिक 11 ऑगस्ट रोजी संपल्यानंतर, पॅरालिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
प्रमोदने टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL3 प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला दिव्यांग खेळाडू ठरला होता. 988 मध्ये जन्मलेल्या भगत यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला, ज्यामुळे त्यांच्या डाव्या पायावर परिणाम होऊन अपंगत्व आले. असे असूनही, वयाच्या 13 व्या वर्षी तो बॅडमिंटन खेळत आहे. अथक सरावाने तो एक व्यावसायिक खेळाडू बनला. त्याचे यश अनेक इच्छुक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनले होते.