पुढारी ऑनलाईन डेस्क : ७६ किलो वजनी गटात कुस्तीपटू रितिका हुड्डाने ( Reetika Hooda) आज (दि.१० ऑगस्ट) उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये हंगेरीच्या बर्नाडेट नागीशी हिचा पराभव केला. तिच्या या विजयामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत आणखी एक पदक मिळवण्याची भारताची आशा कायम राहिली आहे.
रितिका हुड्डाने सामन्यात सुरुवात बचावात्मक केली होती. मात्र पंचांनी दिलेल्या ३० सेकंदांच्या अल्टिमेटमनंतर तिने आक्रमक चाल करत चार गुण पटकावले. यानंतर बर्नाडेट नागीला 12-2 असे हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
रितिका हुड्डा रोहतकच्या खरकडा गावची रहिवासी आहे. रितिकाने वयाच्या ९व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये निवड झाली नव्हती, तेव्हा तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. आई-वडिलांनी तिला पुन्हा कुस्ती खेळण्यासाठी प्रेरित केले. 23 वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी रितिका ही देशातील पहिली महिला खेळाडू आहे.