रावळपिंडी : रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. रावळपिंडीमध्ये रात्रभर भरपूर पाऊस पडल्याने मैदानावर पाणी साचले होते. त्यामुळे सामना सुरू होण्यास सुरुवातीला विलंब झाला होता. आकाश मोकळे झाल्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदान पूर्णपणे सुकलेले नसल्याने पंचांना सामना चालू करता आला नाही. रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही पहिल्या दिवशी पावसाने खोडा घातला होता; पण ती नंतर पूर्ण झाली आणि त्यात बांगला देशने बाजी मारली.
या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर जोरदार टीका झाली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान संघावर दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. कराचीमध्ये स्टेडियमचे नूतनीकरण सुरू असल्याने दुसरा नियोजित कसोटी सामना रावळपिंडी येथे हलविण्यात आला आहे.
बांगला देशने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बांगला देशने आपल्या गुण खात्यात भर घातली.