पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympic 2024 : भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. सोमवारी (दि. 5) दक्षिण पॅरिस एरिना येथे खेळल्या गेलेल्या राउंड ऑफ 16 च्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भारताच्या अर्चना कामथ आणि श्रीजा अकुला जोडीने दुहेरीचा पहिला सामना खेळत भारताला शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या सामन्यात आदिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा या जोडीचा 11-9, 12-10, 11-7 असा पराभव केला. या विजयासह भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली.
भारतीय टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने भारताची आघाडी दुप्पट केली. तिने जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या बर्नाडेट स्झोक्सवर 11-5, 11-7, 11-7 सरळ तीन गेममध्ये विजय मिळवला. अशा प्रकारे भारतीय संघाने रोमानियावर 2-0 अशी आघाडी घेतली.
श्रीजा अकुलाला तिसरा सामना खेळण्यास उतरली. मात्र या एकेरी सामन्यात तिला पराभवाला सामोरे जावे लागले. एलिसाबेटा समाराने 5 गेमच्या रोमहर्षक लढतीत अकुलावर मात केली. युरोपियन चॅम्पियन समाराने 8-11, 11-4, 7-11, 11-6, 11-8 असा विजय मिळवल्याने रोमानियाला स्पर्धेत टिकून राहण्यास मदत झाली. त्यांनी भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली.
चौथा सामना खेळायला उतरलेली अर्चना कामथने निराशा केली. या सामन्यात तिचे आव्हान बर्नाडेट स्झोक्सने परतावून लावले आणि सामना 11-5, 8-11, 11-7, 11-9 असा जिंकला. सलग दुसऱ्या विजयासह रोमानियन संघाने भारताविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली.
ज्यामुळे या फेरीचा निकाल 5 व्या सामन्यावर गेला. या निर्णायक लढतीत मनिका बत्राने एडिना डायकोनू हिचा 11-5, 11-9, 11-9 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला आणि भारताला प्रथमच महिला टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले.