पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics Indian Hockey Team : वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीने भारतीय हॉकी संघाचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. यासह 44 वर्षांनी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहचण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले आहे. सुवर्ण पदाकाच्या लढतीत जर्मनीसमोर नेदरलँडचे आव्हान असेल. तर कांस्य पदकासाठी भारताची स्पेनशी लढत होणार आहे.
भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि पहिल्याच मिनिटाला जर्मनीच्या डीमध्ये धडक मारली. त्यानंतर 30 सेकंदांनंतर पुन्हा एकदा चढाई केली. भारताला दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावेळी हरमनप्रीत सिंगचा फटका जर्मन गोलकीपरच्या पॅडला लागला. अवघ्या एका मिनिटानंतर भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, यावेळीही गोल करण्यात अपयश आले. पहिल्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगचा फटका जर्मन बचावपटूला लागला ज्यामुळे पंचांनी सलग आणखीन एक पेनल्टी कॉर्नर दिला. यावेळी भारताच्या कर्णधार हरमनप्रीतने संधी साधली आणि पहिला गोल डागला. त्याचा हा पॅरिस ऑलिम्पिकमधील नववा गोल ठरला. यासह पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची 1-0 अशी आघाडी राहिली.
दुस-या क्वार्टरमध्ये जर्मनीने रणनिती बदलत पलटवार केला. क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटालाच म्हणजेच सामन्याच्या 18व्या मिनिटाला त्यांनी बरोबरी साधली. जर्मनीने हा गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. गोल केल्यानंतर जर्मनीने भारतावरील दडपण वाढवले. दुसऱ्या क्वार्टरच्या 12व्या मिनिटाला त्यांना पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या सामन्यातील जर्मनीचा हा दुसरा पेनल्टी कॉर्नर ठरला. यावेळी जर्मन खेळाडूने मारलेला फटका भारताचा बचावपटू जरमनसिंगच्या पायाला लागला. ज्यामुळे जर्मनीला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. याचा फायदा घेत ख्रिस्तोफर रुहरने 27व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. यासह जर्मनीने सामन्यात 1-2 अशी आघाडी घेतली.
भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व राखले आणि पहिल्या 6 मिनिटांत 3 पेनल्टी कॉर्नर मिळवले. सामन्याच्या 36व्या मिनिटाला भारताने 10वा पेनल्टी कॉर्नर मिळवला. हरमनप्रीत सिंगने धारदार फटका लगावला. सुखजीतने मोक्याच्या क्षणी चेंडूला वळण दिले आणि चेंडूने गोलजाळे गाठले. यासह भारताला 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश आले.
मार्को मिल्टकाऊने चौथ्या क्वार्टरमध्ये मैदानी गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. सामन्याला 3 मिनिटे बाकी असताना भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने मैदान सोडले. त्याच्या जागी भारताने एका मैदानी खेळाडूची भर घातली. अखेरच्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती, मात्र भारताला गोल करता आला नाही. पूर्णवेळची शिट्टी वाजली आणि भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये फायनल खेळण्याची संधी गमावली.