पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरीस ऑलिम्पिक ( Paris Olympics 2024) मध्ये पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या नोहा लायल्स ( Noah lyles) याने सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली आहे. नाेहा लायल्सने ९.७८४ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले. या यशानंतर त्याने सोशल मीडियावर सर्वांसाठी एक प्रेरणादायी पोस्ट केली आहे. अवघ्या चार ओळींच्या या पोस्टमध्ये त्याने आपण कोणत्या अडथळ्यांवर मात करत यश मिळवले आहे. तुम्ही प्रयत्न तर करा यश तुमचेच असते, असा संदेशही दिला आहे.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये पुरुष १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर आपल्या अधिकृत X (Twitter) अकांउटवर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, "मला दमा, ऍलर्जी, डिस्लेक्सिया, चिंता आणि नैराश्य (डिप्रेशन) आहे; पण मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही काय बनू शकता हे ठरवत नाही. तुम्ही का नाही!"
नोहाने अनेक संकटावर मात करत ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेला १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २० वर्षानंतर सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. यानंतर त्याने विशेष पोस्ट करुन जगभरातील लाखो लोकांना प्रेरणाही दिली आहे.
पुरुषांच्या 100 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकणारा जस्टिन गॅटलिननंतर लायल्स हा पहिला अमेरिकन ॲथलीट आहे. गॅटलिनने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. लायल्सने वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ९.७८४ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थॉम्पसनने ९.७८९ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. लायल्स आणि थॉम्पसन यांच्यात केवळ ०.५ सेकंदाचे अंतर होते. तर कांस्यपदक जिंकणाऱ्या केर्लीने ९.८१० सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान पटकावले.
नोहा लायल्स (Noah Lyles) याने गेल्या वर्षी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 100 मीटर आणि 200 मीटर चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या. त्याने गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी उसेन बोल्ट २०० मीटरचा विश्वविक्रम मोडणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. मात्र या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकूनही तो बोल्टचा विक्रम मोडू शकला नाही. लायल्सने त्यावेळी 19.52 सेकंदाची वेळ घेतली होती, तर बोल्टच्या नावावर 19.19 सेकंदाचा विक्रम आहे.