पुढारी ऑनलाईन डेस्क : दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होणार आहेत. चारही संघांचे संघ बीसीसीआयने आधीच जाहीर केले होते. पण आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठे बदल झाले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमरान मलिक हे बाहेर आहेत. तर रवींद्र जडेजाला रिलीज करण्यात आले आहे.
सिराज आणि उमरान यांची प्रकृती बिघडली आहे. ते दुलीप ट्रॉफी सामन्यांसाठी वेळेत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा नाही. सिराजचा भारत-बी संघात तर उमरानचा भारत-सी संघात समावेश आहे. आता त्यांच्या जागी अनुक्रमे नवदीप सैनीआणि गौरव यादवला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, जडेजाच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही.
नवदीप सैनीने 2021 साली भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. आता त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. जर तो यशस्वी झाला तर अगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड होण्याची शक्यता. तो भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 2 कसोटी सामने खेळला असून ज्यात त्याने 4 बळी घेतले आहेत. तर 8 एकदिवसीय सामन्यांत 6 विकेट आणि 11 टी-20 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले आहेत.
या मोसमात दुलीप ट्रॉफी नव्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा पूर्वीसारखी क्षेत्रीय स्वरूपात आयोजित केली जाणार नाही. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड या चार संघांची निवड केली आहे.
भारत बी संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन. जगदीसन.
भारत सी संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल, संदीप वारियर