

आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्यात विक्रमांची बरसात झाली आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज खेळीने एकाहून एक पराक्रम नोंदवले, तर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) तरुण खेळाडू उर्विल पटेलने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत ७० साखळी सामने खेळले गेले असून, त्यात अनेक अद्भूत विक्रम नोंदवले गेले आहेत. या हंगामात २०० हून अधिक धावांचे सर्वाधिक विक्रम मोडीत निघाले आहेत. याव्यतिरिक्त तीन वर्षांनंतर सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम बरोबरीत आला असून, वैभव सूर्यवंशीनेही विक्रमांची मालिकाच रचली आहे. जाणून घेऊया प्लेऑफच्या लढतींपूर्वी या हंगामात नोंदवलेले ५ प्रमुख विक्रम...
आयपीएल २०२५ मध्ये ५२ वेळा संघांनी २०० पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्यातच हा आकडा ६१ वर पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात २०० हून अधिक धावा झाल्या असून, एकाच हंगामात सर्वाधिक २०० प्लस स्कोअरचा हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
२०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालने केकेआरविरुद्ध अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक झळकावून नवा विक्रम रचला होता. तब्बल तीन वर्षांनंतर कोणीतरी या विक्रमाची बरोबरी केली आहे. सीएसकेच्या उर्विल पटेलने आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत जैस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग याच हंगामात पाहायला मिळाला. लीग स्टेजमधील एका थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २६४ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने २६५ धावांचे लक्ष्य गाठत विजय मिळवला आणि आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा रन चेज नोंदवला.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक १४ शतकांचा विक्रम २०२४ मध्ये नोंदवला गेला होता. आयपीएल २०२६ च्या लीग टप्प्यादरम्यानच या विक्रमाची बरोबरी झाली आहे. अद्याप प्लेऑफचे चार सामने बाकी आहेत, त्यामुळे हा विक्रम मोडला जाऊन २०२६ चा हंगाम इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाण्याची दाट शक्यता आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ च्या लीग स्टेजमधील १४ सामन्यांत ५८३ धावांचा रतीब घातला. एका हंगामात ५०० हून अधिक धावा करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याने साखळी सामन्यांत ५३ षटकार ठोकले, जो आयपीएलच्या इतिहासातील एक अनोखा पराक्रम आहे. एका हंगामात ५० षटकारांचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय आणि सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आता क्रिस गेलच्या एका हंगामातील सर्वाधिक ५९ षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ ७ षटकारांची गरज आहे.