पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh Test Series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नईत तर दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. आता हळूहळू तारीख जवळ येत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय निवड समिती टीम इंडियाची घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान, दुलीप ट्रॉफीवर निवडकर्त्यांच्या नजरा लागले आहे. खेळाडू येथे कशी कामगिरी करतील, त्यावर त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाणार आहे.
भारतीय संघाचा प्रदीर्घ ब्रेक आता संपणार आहे. पाकिस्तानचा दोन कसोटीत सामन्यांच्या मालिकेत सुपडासाफ केल्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. मात्र, भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण पाकिस्तानविरुद्ध संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, त्यात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. दरम्यान, टीम इंडियाच्या घोषणेबद्दल बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले आहे की पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी भारतीय संघाची घोषणा केली जाईल, ज्याचा कर्णधार रोहित शर्मा असेल.
दुलीप ट्रॉफीचे सामने 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेवर निवड समितीची नजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असे काही खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत. पण अशा खेळाडूंची मोठी फौज आहे, जी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी आपला दावा ठोकत आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये जो खेळाडू चांगला खेळेल त्याला भारतीय संघात सामील होण्याची मोठी संधी आहे.
भारतीय कसोटी संघ मार्चनंतर पुन्हा एकदा कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. निवडकर्ते संघात फारसे बदल करणार नसल्याचे समजत आहे. पण तरीही दुलीप ट्रॉफीमध्ये एखाद्या खेळाडूने अपवादात्मक कामगिरी केली, तर त्याचा फायदा त्याला नक्कीच होऊ शकतो. बांगलादेशविरुद्धची मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. टीम इंडिया सध्याच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून डब्ल्यूटीसीच्या याही मोसमात रोहित सेना अंतिम फेरीत गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही मागे नाही. अशा स्थितीत भारतीय संघाला ही मालिका जिंकून गुणतालिकेत आघाडी वाढवण्याची संधी आहे.